breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

संपाचा दिवस लुटीचा

रिक्षा, टॅक्सी आणि खासगी बस चालकांचे प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा भाडे

मुंबई : बेस्ट कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे मुंबईकरांचे हाल होऊ नयेत, म्हणून मंगळवारी रेल्वे, मेट्रो आणि एसटीने मदतीचा हात दिला. बेस्ट प्रवाशांच्या संख्येपुढे या वाढीव फेऱ्या तोकडय़ाच पडत असताना, रिक्षा, टॅक्सी आणि खासगी बस चालकांनी याचा गैरफायदा घेतला. जादा भाडे आकारून प्रवाशांची लूट करण्यात आली.

संपाचा गैरफायदा घेत अनेक ठिकाणच्या टॅक्सी आणि रिक्षा चालक व खासगी बस चालकांनी जादा दर आकारण्यास सुरुवात केली. खासगी बसने जास्त भाडे आकारल्याच्या तक्रारी प्रवाशांनी वाहतूक पोलिसांकडे केल्या. खासगी बसकडून नेहमीपेक्षा १० ते ३० रुपये जास्त आकारण्यात आले. कुर्ला पश्चिमेकडून वांद्रे कुर्ला संकुल, कुटुंब न्यायालयाकडे जाण्यासाठी शेअर रिक्षाचालक २५ रुपयांऐवजी ४० रुपये भाडय़ाची मागणी करत होते. या लुटीबाबत मुंबईकरांनी तीव्र नाराजीही व्यक्त केली.

खासगी बस चालकांनी गोरेगाव स्थानक पश्चिम ते मरोळ प्रवासासाठी  २२ रुपयांऐवजी ३५ रुपये घेतले, असे मयुरी सावंत या प्रवासी महिलेने सांगितले. अनेक प्रवाशांनी एकमेकांना मदत करत रिक्षा-टॅक्सीत ‘शेअर’ने प्रवास केला. गोरेगाव येथे देखील रिक्षासाठी रांगा लागल्या होत्या. रिक्षाचालक दोन ते चार किलोमीटरमध्ये येण्यासाठी तयार नव्हते. शेअर रिक्षामध्ये १० रुपयांऐवजी १५, २० रुपये ही आकारले जात होते, असे गोरेगाव प्रवासी संघाचे अध्यक्ष उदय चितळे यांनी सांगितले.

बेस्ट संपाच्या पाश्र्वभूमीवर मेट्रो-१ प्रशासनाने घाटकोपर-वर्सोवा या मेट्रो मार्गावर मंगळवारी फेऱ्यांमध्ये वाढ केली.

या मार्गावर रोज मेट्रोच्या ४४० फेऱ्या होतात. मात्र संपाच्या अनुषंगाने १२ अतिरिक्त फेऱ्यांचे नियोजन मेट्रो-१ प्रशासनाने केले. त्यामुळे मंगळवारी मेट्रोच्या ४१२ फेऱ्या झाल्या.

एसटीचा मदतीचा हात

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाच्या पाश्र्वभूमीवर एसटी महामंडळानेही सकाळपासून दिवसभर  ५५ बस गाडय़ांच्या १२३ फेऱ्या चालवल्या. कुर्ला पश्चिम ते वांद्रे, कुर्ला पूर्व ते चेंबूर, दादर ते मंत्रालय, पनवेल ते मंत्रालय, पनवेल ते दादर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुलाबा, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मंत्रालय, ठाणे ते मंत्रालय अशा बस फेऱ्या चालवण्यात आल्या.

रेल्वेच्या जादा फेऱ्या

पश्चिम व मध्य रेल्वेनेही जादा लोकल फेऱ्या सोडल्या. त्यामुळे थोडा फार दिलासा  मिळाला. ठाणे ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण अशा लोकल फेऱ्या चालवण्यात आल्या. हार्बरवरही वाशी ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेलसाठी तसेच पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते बोरिवली आणि अंधेरी, गोरेगावसाठीही जादा फेऱ्या सोडण्यात आल्या होत्या. बुधवारीही संप कायम राहिल्यास रेल्वेने आणखी काही फेऱ्या सोडण्याची तयारी दर्शविली होती.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button