breaking-newsताज्या घडामोडीपुणे

संतापजनक! एक्स्प्रेस वेवर शेतकऱ्याला १० ते १५ गाड्यांनी उडविले

पुणे | महाईन्यूज

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर बुधवारी संध्याकाळी झालेल्या एका विचित्र अपघातात एका ४७ वर्षांच्या शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. एका अज्ञात गाडीने या शेतकऱ्याला रस्त्यावर उडविल्यानंतर १० ते १५ गाड्या एका मागून एक त्याच्या अंगावरून गेल्या आहेत. यामध्ये शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. अशोक मगर असे या शेतकऱ्याचे नाव आहे. ते बऊर गावातील राहणारे आहेत. मुंबईहून पुण्याकडे येणाऱ्या मार्गावर संध्याकाळी सव्वाआठच्या सुमारास ही घटना घडलेली आहे.

या संदर्भात माहिती देताना कामशेत पोलिस ठाण्याचे निरीक्षक विठ्ठल दाभाडे म्हणाले, द्रुतगती मार्गावर एका व्यक्तीला एकापेक्षा अधिक गाड्यांनी चिरडल्याची माहिती आम्हाला महामार्ग पोलिसांकडून साडेआठच्या सुमारास मिळाली. आमचे एक पथक लगेचच घटनास्थळी रवाना झाले आहेत. आम्ही तिथे पोहोचल्यावर मृतदेहाचे अक्षरशः वेगवेगळे तुकडे झाल्याचे आम्हाला बघायला मिळाले. १० ते १५ गाड्यांनी या व्यक्तीला चिरडले असण्याची शक्यता आहे. त्यामुळेच त्या व्यक्तीच्या देहाचे तुकडे झाले असावेत. या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. त्यामुळे कोणत्या गाड्यांनी अशोक मगर यांना उडविले हे अद्याप स्पष्ट झालेले नाहीये.

घटनास्थळी पोहोचल्यावर पोलिसांनी या मार्गावरील वाहतूक काही काळासाठी थांबविली. त्यानंतर मृतदेहाचे सर्व भाग एकत्रितपणे गोळा करण्यात आले. या घटनेची माहिती कळताच बऊर गावातील रहिवासी तिथे जमा झाले. अशोक मगर यांचा मुलगाही तिथे आला. त्याने बुटांवरून आपल्या वडिलांना ओळखले, असे विठ्ठल दाभाडे यांनी सांगितले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button