breaking-newsआंतरराष्टीय

पाकिस्तानातील इम्रानविरोधी आंदोलकांना लष्कराचा इशारा

पाकिस्तानात धर्मगुरू व राजकीय नेते मौलान फजलूर रेहमान यांनी इम्रान सरकारला पायउतार होण्यास दोन दिवसांचा अवधी देऊन मोठे जनआंदोलन सुरू केले असतानाच लष्कराने मात्र देशात अस्थिरता माजवण्याचे प्रयत्न खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशारा दिला आहे. आझादी मोर्चा शुक्रवारी काढण्यात आला होता, त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. इम्रान सरकार पाडण्यासाठी रेहमान यांनी मोर्चाचे आयोजन केले होते. हजारो निदर्शकांपुढे बोलताना रेहमान यांनी असे सांगितले, की ‘पाकिस्तानच्या गोर्बाचेव्हने ताबडतोब राजीनामा द्यावा, त्यासाठी निदर्शकांच्या सहनशक्तीचा अंत पाहू नये. पाकिस्तानातील लोक व संस्था यांनाच पाकिस्तानवर राज्य करण्याचा अधिकार आहे. आम्हाला आमच्याच संस्थांशी संघर्ष करायचा नाही, पण त्यांनी तटस्थ रहावे. आम्ही सगळ्या संस्थांना दोन दिवसांचा अवधी देत आहोत त्यात त्यांनी सरकारच्या पाठीशी राहायचे की विरोध करायचा हे ठरवायचे आहे.’

दरम्यान, पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल असीफ गफूर यांनी सांगितले, की ‘मौलाना फजलुर रहमान हे वरिष्ठ राजकारणी आहेत. त्यांनी ते कुठल्या संस्थेबाबत बोलत आहेत ते आधी सांगावे. पाकिस्तानचे लष्कर ही तटस्थ संस्था आहे, लष्कराने नेहमीच लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या सरकारांना पाठिंबा दिला आहे. देशात कुणालाही अस्थिरता माजवू दिली जाणार नाही. लष्कर हे घटनेनुसार लोकशाही सरकारला पाठिंबा देत आहे.’

२०१८ च्या निवडणुकीत लष्कर तैनात करण्याच्या मुद्दय़ाचे समर्थन करताना त्यांनी सांगितले, की ‘आम्ही निवडणुकांवेळी आमची घटनात्मक जबाबदारी पार पाडली. जर विरोधकांना त्या निवडणुकीच्या निकालाबाबत काही आक्षेप असतील तर त्यांनी संबंधित मंचावर ते मांडावेत, रस्त्यावर येऊन आरोप करू नयेत. सर्व प्रश्न लोकशाही मार्गाने सोडवता येतात यावर आमचा विश्वास आहे.’ सरकार व निदर्शक यांच्यातील संवादाचे त्यांनी स्वागत केले.

गफूर यांच्या वक्तव्यावर रेहमान यांनी सांगितले,की ‘लष्कराच्या प्रवक्तयांनी लष्कराची तटस्थता सांभाळण्यासाठी कुठलेही विधान करणे योग्य नाही. विरोधी पक्षांची  बैठक होत असून त्यात दोन दिवसात इम्रान खान यांनी राजीनामा दिला नाही तर पुढे काय करायचे याचा निर्णय घेतला जाईल. रेहमान यांच्या जमियत उलेमा ए इस्लाम फज्ल या पक्षाने आझादी मोर्चा आयोजित केला होता. गुरुवारी तो इस्लामाबाद येथे अंतिम टप्प्यात पोहोचला असता रेहमान यांच्यासमवेत पाकिस्तान मुस्लीम लीग नवाझ, पाकिस्तान पीपल्स पार्टी, अवामी नॅशनल पार्टी यांचे सदस्य होते. पाकिस्तानातील तेहरीक ए इन्साफ पक्षाचे इम्रान यांच्या नेतृत्वाखालील सरकार पाडण्याचा निर्धार रेहमान यांनी केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button