breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

श्री क्षेत्र भीमाशंकरमध्ये “हर हर महादेव”च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला

पुणे |महाईन्यूज|

श्री क्षेत्र भीमाशंकर येथे महाशिवरात्रीनिमित्त बारा ज्योर्तिलिंगापैकी असलेल्या ज्योर्तिलिंगाचे दर्शन घेण्यासाठी गुरुवारी रात्री बारापासूनच दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. “हर हर महादेव”च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता. मंदिर परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली होती. शुक्रवारी सकाळी साडे अकरावाजेपर्यंत सव्वा लाख भाविकांनी दर्शन घेतल्याचा अंदाज घोडेगाव पोलिसांनी व्यक्त केला आहे. 

दरवर्षी ज्योर्तिलिंगाचा मानाचा अभिषेक केला जातो. गुरुवारी मध्यरात्री उशिरा राज्याचे कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, किरण वळसे पाटील, स्वाभिमानी शेतकरीचे अध्यक्ष राजू शेट्टी, आमदार दिलीप मोहिते, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, तहसीलदार रमा जोशी यांच्या हस्ते शासकीय महापुजा झाली. त्यानंतर भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. मध्यप्रदेश, गुजरात, कर्नाटक, आंध्रप्रदेश राज्यातील भाविक येथे मुक्कामीच आले होते. हनुमान तळ्यावरही स्नानासाठी भाविक व नाथपंथीय जाटाधरी साधुंची गर्दी झाली होती.

शुक्रवारी सकाळ पासूनच मंदिरापासून दोन किलोमीटर असलेल्या बसस्थानकापर्यंत भाविकांच्या रांगा लागल्याचे दृश्य पहावयास मिळाले. पुणे ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पाटील, खेडचे उपविभागीय पोलीस अधिकार्री गजानन टोम्पे, पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप पवार यांच्यासह १७ पोलीस अधिकारी व २०० पोलीस कर्मचाऱ्यांचा येथे बंदोबस्त तैनात केला आहे. चोरीचे प्रकार घडू नयेत म्हणून साध्या वेशातील पुरुष व महिला कर्मचारी येथे कार्यरत आहेत. मंदिरापासून चार किलोमीटर अंतरावर चार ठिकाणी पार्किंग व्यवस्था केली आहे. तेथून पुढे मंदिराकडे जाण्यासाठी वीस मिनी एसटी बस व भीमाशंकर देवस्थानच्या वतीने दहा खासगी बसची व्यवस्था केली आहे.

वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून घोडेगाव व राजगुरुनगरचे वाहतूक विभागाचे पोलीस कार्यरत आहेत. स्वयंसेवी संस्थांनी व वनव्यवस्थापन समित्यांनी प्लास्टिक बंदी बाबत व ज्ञानशक्ती विकास वाहिनी संस्थेने पाण्याचा काटकसरीने वापर होण्याबाबत जनजागृती केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button