breaking-newsआंतरराष्टीय

श्रीलंकेत राजकीय धुमश्चक्री

अर्जुन रणतुंगांच्या सुरक्षारक्षकाचा गोळीबार; नवनियुक्त पंतप्रधान राजपक्षे यांचा समर्थक ठार

श्रीलंकेतील सत्ता पेचप्रसंगाने रविवारी हिंसक वळण घेतले. श्रीलंकेचे पदच्च्युत पंतप्रधान रनिल विक्रमसिंघे यांचे विश्वासू समर्थक आणि पेट्रोलियममंत्री अर्जुन रणतुंगा यांच्या सुरक्षारक्षकाने नवनियुक्त पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांच्या समर्थकांवर गोळीबार केला. त्यात एकाचा मृत्यू, तर दोघे जखमी झाले. या प्रकारामुळे श्रीलंकेतील सत्तासंघर्ष चिघळण्याची लक्षणे आहेत.

गोळीबाराचा कोलंबोतील प्रकार सिलोन पेट्रोलियम कॉर्पोरेशन (सीपीसी) परिसरात घडला. गोळीबार करणाऱ्या रणतुंगा यांच्या सुरक्षारक्षकाला अटक करण्यात आली आहे. त्याने गोळीबाराच्या पाच फैरी झाडल्या. त्यात राजपक्षे यांचे तीन समर्थक जखमी झाले. त्यापैकी एकाचा रुग्णालयात पचाराआधीच मृत्यू झाला. पदच्च्युत विक्रमसिंघे सरकारमधील पेट्रोलियममंत्री आणि माजी क्रिकेटपटू रणतुंगा रविवारी सीपीसी कार्यालयास भेट देण्यासाठी आले होते. त्यांच्या भेटीला अनेक पेट्रोलियम कामगारांनी तीव्र आक्षेप घेतला. रणतुंगा यांनी सीपीसीच्या इमारतीत प्रवेश करताच नवनियुक्त पंतप्रधान राजपक्षे यांच्या समर्थकांनी त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. राजपक्षे यांच्या समर्थकांनी रणतुंगा यांचा मार्ग रोखल्याने त्यांच्या सुरक्षारक्षकांनी गोळीबार केला. त्यात तिघे जखमी झाले. त्यापैकी एक जागीच ठार झाल्याचे पोलिसांनी सांगितले. अनधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गोळीबारप्रकरणी रणतुंगा यांच्या दोन सुरक्षारक्षकांना अटक करण्यात आली आहे.

रणतुंगा हे विक्रमसिंघे यांचे समर्थक आहेत. श्रीलंकेचे अध्यक्ष मैत्रिपाल सिरीसेना यांनी शुक्रवारी रात्री विक्रमसिंघे यांना पंतप्रधानपदावरून हटवून त्यांच्या जागी महिंदा राजपक्षे यांची नियुक्ती केली. त्यामुळे श्रीलंकेत सत्तासंघर्ष पेटला आहे. त्यातूनच आजचा गोळीबाराचा प्रकार घडला.

विक्रमसिंघेंना बळ

पदच्च्युत पंतप्रधान रनिल विक्रमसिंघे यांनी सरकारी निवासस्थान सोडण्यास नकार दिल्याने राजकीय पेच निर्माण झाला आहे. संसद अध्यक्ष कारू जयसूर्या यांनी विक्रमसिंघे यांची पाठराखण केली आहे.  त्यांना पदच्च्युत करण्याचा अध्यक्ष सिरीसेना यांच्या निर्णयास मान्यता देण्यासही त्यांनी नकार दिला आहे. त्यामुळे विक्रमसिंघे यांना एका अर्थाने बळ मिळाले आहे. त्यांनी संसदेचे अधिवेशन बोलावण्याची मागणी केली आहे.

अध्यक्ष सिरीसेना यांनी आपले सरकार बरखास्त करून नव्या पंतप्रधानांची केलेली नियुक्ती बेकायदा आहे. बहुमत सिद्ध करण्यासाठी संसदेचे तातडीचे अधिवेशन बोलावण्याची मागणी केली आहे.   -रनिल विक्रमसिंघे, पदच्च्युत पंतप्रधान, श्रीलंका

आज शपथविधी? – नवनियुक्त पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांच्या नेतृत्वाखालील काळजीवाहू सरकारचा शपथविधी सोमवारी, २९ ऑक्टोबरला होण्याची शक्यता आहे. अध्यक्ष मैत्रीपाल सिरीसेना यांनी संसद १६ नोव्हेंबपर्यंत निलंबित केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button