breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

शेतकरी आंदोलनावर चर्चा का नाही? जगप्रसिद्ध पॉपस्टार रिहानाचा सवाल

नवी दिल्ली – केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात मागील ६९ दिवसांपासून दिल्लीच्या वेगवेगळ्या बॉर्डर्सवर शेतकऱ्यांचे तीव्र आंदोलन सुरू आहे. ऐन कडाक्याच्या थंडीतही शेतकऱ्यांचा निर्धार ढळला नाहीये. या आंदोलनाबाबत जागतिक स्तरावरून चिंता व्यक्त केली जातेय. तसेच मोदी सरकारवर निशाणाही साधण्यात येत आहे. अशातच जगप्रसिद्ध पॉपस्टार रिहाना हिने भारतातील शेतकरी आंदोलनाबाबत प्रश्न उपस्थित केला आहे. तिने सीएनएन या वृत्तसंस्थेची एक बातमी ट्विट केली आहे. देशात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला दडपण्यासाठी इंटरनेट सुविधा बंद केली असल्याचे सांगणारी तसेच एकूण शेतकरी आंदोलनाबाबत माहिती देणारी ही बातमी आहे. ही बातमी ट्विट करत रिहानाने ‘आपण याबाबत चर्चा का नाही करत’, असा सवाल केला असून #FarmersProtest हा हॅशटॅग वापरला आहे. तिचे हे ट्विट प्रचंड व्हायरल झाले असून त्यावर जगभरातून लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

बारबडोजमध्ये जन्मलेली आणि अमेरिकेत पॉपस्टार म्हणून नाव कमावणारी रिहाना नेहमीच सामाजिक विषयांवर प्रतिक्रिया देते. गेल्या काही दिवसांआधीच तिने म्यानमारच्या विषयावरही ट्विट केले होते. यामध्ये माझ्या प्रार्थना म्यानमारसोबत असल्याचे तिने म्हटले होते. रिहानाचे पूर्ण नाव रोबीन रिहाना फेंटी असे असून तिचा जन्म 20 फेब्रुवारी 1988ला झाला होता. ती एक बारबेडिअन पॉपस्टार, मॉडेल आणि प्रसिद्ध व्यावसायिक आहे. तिला वयाच्या 16 व्या वर्षी रेकॉर्डिंग करिअरसाठी रेकॉर्ड निर्माता इव्हान रॉजर्सने अमेरिकेत बोलावले होते. 2005 मध्ये रिहानाने तिचा पहिला स्टुडिओ अल्बम, म्युझिक ऑफ द सन प्रसिद्ध केला होता. जो बिलबोर्ड 200 चार्टच्या पहिल्या दहामध्ये पोहोचला. त्यानंतर एका वर्षापेक्षा कमी काळात रिहानाने तिचा दुसरा स्टुडिओ अल्बम, ए गर्ल लाइक मी (2006) प्रसिद्ध केला. तिच्या या अल्बम्सला नागरिकांनी प्रचंड पसंती दिली. हा बिलबोर्ड अल्बमवरील चार्टच्या पहिल्या पाचमध्ये पोहोचला होता. दरम्यान, रिहानाच्या चाहत्यांची भारतातही कमी नाही. जगातील सर्वात श्रीमंत महिला संगीतकारांत 32 वर्षीय रिहानाचा समावेश आहे.

महत्त्वाचे म्हणजे केवळ रिहानानेच नाही तर पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग हिनेदेखील भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. तिने म्हटलंय, ‘आम्ही भारतातील शेतकऱ्यांच्या सोबत आहोत.’ मंगळवारी रात्री उशिरा तिने हे ट्विट केले आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button