breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

शिक्षक पती-पत्नीसाठी आमदार रोहित पवारांचा पुढाकार, मंत्री महोदयांना निवेदन

मुंबई | महाईन्यूज

जिल्हा परिषद शिक्षकांची सर्वात मोठी अडचण म्हणजे बदली हीच असते. त्यातच, पती आणि पत्नी दोघेही शिक्षक असतील, तर दोघांच्या नोकरीमुळे कुटुंबाची मोठी हेळसांड होते. नवरा एका गावात अन् बायको दुसऱ्या गावात. त्यामुळे मुलांची, त्यांच्या शिक्षणाची आणि कुटुंबाची वाताहत होते. कर्जत-जामखेडचे आमदार आणि राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी जिल्हा परिषदेतील पती-पत्नी शिक्षकांच्या बदलीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आणलेला आहे. रोहित पवार यांनी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रिफ यांची भेट घेऊन, जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या पती-पत्नींना एकत्र आणण्याची विनंती केली आहे. याबाबतच्या मागणीचे पत्रही त्यांनी मुश्रिफ यांना दिले आहे.

जिल्हा परिषद शाळांमध्ये कार्यरत असलेले अनेक पती-पत्नी हे गेल्या १०-१५ वर्षांपासून शेकडो कि.मी. दूर अंतरावर वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये काम करतात. त्यामुळं त्यांना अनेक वेगवेगळ्या कौटुंबिक अडचणींना सामोरं जावं लागतंय. एकतर त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची परवड होते, दुसरीकडे त्यांच्या कौटुंबिक स्वास्थ्यावरही विपरित परिणाम होत असल्याने काही जणांचे घटस्फोटही होत आहेत, असे रोहित पवार यांनी निदर्शनास आणून दिले. तसेच, हे टाळण्यासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यात कार्यरत असलेल्या शिक्षक पती-पत्नीला एकत्रित राहता यावे, यासाठी त्यांची प्राधान्याने बदली करण्याचा निर्णय सप्टेंबर २०११ मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारने घेतला होता. परंतु नंतर मागील भाजप सरकारने एप्रिल २०१७ मध्ये बदल्यांच्या प्राधान्यक्रमात पुन्हा बदल केला. यामुळे वेगवेगळ्या जिल्ह्यात कार्यरत असलेल्या शिक्षक पती-पत्नीची एका जिल्ह्यात बदली करण्यात अडथळा निर्माण झाला. याचा एकूणच शिक्षकांच्या कुटुंबावर आणि शैक्षणिक गुणवत्तेवर विपरित परिणाम होत आहे, असेही रोहित पवार यांनी मुश्रिम यांच्याशी बोलताना म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button