breaking-newsपुणेमहाराष्ट्र

शांता गोखले, आनंदवन संस्थेला जीवनगौरव

‘महाराष्ट्र फाउंडेशन’चे पुरस्कार जाहीर

अमेरिकेत स्थायिक झालेल्या मराठी व्यक्तींनी स्थापन केलेल्या ‘महाराष्ट्र फाउंडेशन’तर्फे देण्यात येणारा ‘साहित्य जीवनगौरव’ पुरस्कार यंदा ज्येष्ठ लेखिका आणि समीक्षक शांता गोखले यांना तर सामाजिक कार्यासाठी देण्यात येणारा ‘समाजकार्य जीवनगौरव’ पुरस्कार बाबा आमटे यांनी स्थापन केलेल्या ‘आनंदवन’ संस्थेला जाहीर करण्यात आला आहे.

समाजकार्य जीवनगौरव पुरस्कार निवड समितीच्या अध्यक्ष विजया चौहान यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत या पुरस्कारांची माहिती दिली. यावेळी साहित्य जीवनगौरव पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष मुकुंद टाकसाळे, महाराष्ट्र फाउंडेशनच्या माजी अध्यक्ष सुनीता धुमाळे आणि समन्वयक विनोद शिरसाट उपस्थित होते.

मुंबई येथील केशव गोरे स्मारक ट्रस्ट आणि पुणे येथील साधना ट्रस्ट या संस्थांतर्फे या कार्यक्रमाचे संयोजन केले जाते. सत्तावीस जानेवारीला होणाऱ्या या सोहळ्यामध्ये हे पुरस्कार व्यक्ती आणि संस्थांना प्रदान करण्यात येणार आहेत. कथेसाठी देण्यात येणारा वाङ्मय पुरस्कार सानिया यांना प्रदान केला जाईल. कादंबरीसाठीचा ललित ग्रंथ पुरस्कार प्रवीण बांदेकर यांना ‘उजव्या सोंडेच्या बाहुल्या’ या कादंबरीसाठी जाहीर झाला असून नाटय़लेखनासाठी राजीव नाईक यांना रा. शं. दातार नाटय़पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. हरी नरके यांना समाजप्रबोधन पुरस्कार, असंघटित कष्टकऱ्यांसाठी काम करणाऱ्या संगमनेर येथील निशा शिवूरकर यांना तसेच अमरावती येथील सामाजिक कार्यकर्ते मतीन भोसले यांना कार्यकर्ता पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती पुरस्काराची घोषणा शुक्रवारी (११ जानेवारी) करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र फाउंडेशनतर्फे देण्यात येणाऱ्या पुरस्कारांचे यंदाचे पंचविसावे वर्ष आहे.

चोवीस वर्षांमध्ये तीनशे वीस व्यक्ती आणि संस्थांना हे पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. पुरस्काराच्या रौप्यमहोत्सवानिमित्त विशेष संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात येणार आहे.

चोवीस वर्षांतील सर्व पुरस्कार विजेत्यांची माहिती, त्यांच्या कामाचे स्वरूप, मुलाखती, पुरस्कार सोहळ्यातील भाषणाचा अंश अशी सर्व माहिती त्या संकेतस्थळावर उपलब्ध होणार असल्याचे विनोद शिरसाट यांनी यावेळी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button