breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शहर अभियंता अंबादास चव्हाण यांना निलंबित करा – मारुती भापकर

  • 360 निविदा गैरव्यवहार प्रकरण
  • सखोल चौकशी करण्याची मागणी

पिंपरी – महापालिकेतील ‘रिंग’झालेल्या ३६० निविदा गैरव्यवहाराला जबाबदार असणारे शहर अभियंता अंबादास चव्हाण व या प्रक्रियेतील कार्यकारी अभियंता, उपअभियंता यांना निलंबित करून या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी केली आहे.

यासंदर्भात भापकर यांनी आयुक्त श्रावण हार्डीकर यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, महापालिकेच्या चालू आर्थिक वर्षात स्थापत्य विषयक कामांच्या निविदा प्रक्रिया राबविण्यात आल्या. त्यात प्रामुख्याने काँक्रिटीकरण, पेव्हिंग ब्लॉक- रंगीत रबर मोल्डेड पेव्हिंग ब्लॉक बसविणे, स्टॉर्म वॉटर लाईन करणे, चर दुरुस्ती, रस्त्यांचे खडीकरण-मजबुतीकरण दुरुस्तीकाम करणे, पावसाळी गटर्स करणे, फुटपाथची दुरुस्ती, महापालिका मालकीच्या इमारतींची देखभाल-दुरुस्ती, रंगरंगोटी, नदी-घाट विकसित करणे, शौचालय बांधणे, उद्यान नुतनीकरण, स्ट्रीट फर्निचर बसविणे, आदी कामांचा यात समावेश होता. हि सर्व कामे १० लाख ते ४० लाखांच्या रक्कमेची होती.

या कामांच्या निविदा प्रक्रियेत अधिकारी, ठेकेदार, नगरसेवक यांनी संगनमत करत ‘रिंग’ करून निविदा भरल्या एकमेकांच्या संगणकावरून निविदा भरणे, एकाच खात्यातून इतर ठेकेदारांच्या अनामत रक्कमेचा ड्राफ्ट काढणे, प्रतिस्पर्धी ठेकेदाराचा पत्ता एकच असणे, किमान ३ निविदा आल्याचे भासवण्यासाठी बोगस निविदाकार उभा करणे, त्यासाठी त्याला कागदपत्र पुरविणे आदी गैरप्रकारांबरोबरच ठेकेदारांना दमदाटी करणे, इतर ठेकेदारांची कामे न करण्यासाठी नडने, ठेका मिळालाच तर कामे रोखून धरणे, या प्रकारामुळे अधिकारी ठेकेदार त्रस्त आहेत. गेल्या दीड वर्षांत ठेका घेतल्यावरही विहित मुदतीत कामाचा पत्ता नाही. दर्जेदार कामाची हमी नाही, बिलासाठी मात्र तगादा लावला जातो. त्यामुळे अशा परिस्थितीमुळे ठेकेदार व अधिकारी तोंड दाबून बुक्यांचा मार सहन करत आहेत.

निविदा प्रक्रियेत पारदर्शकता असावी म्हणून एकाच ‘आयपी अॅड्रेस’वरून भरलेल्या ३५० हून अधिक निविदा बाद केल्या आहेत. त्यामागे तांत्रिक कारणे शोधून गैरप्रकार होऊ नयेत, ठेकेदारांना चांगल्या सवयी लागाव्यात, शंकांना वाव राहु नये म्हणून वरील ५४ कोटींच्या ३६० निविदा रद्द करून फेर निविदा मागविण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, निविदांमध्ये निकोप स्पर्धा आणि गुणवत्ता पूर्ण कामे व्हावीत म्हणून महापालिकेच्या सर्व निविदा राज्य सरकारच्या संकेत स्थळांवर उपलब्ध असतील असे आपण जाहीर केले. त्याबद्दल आपल्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो.

परंतु, पिंपरी-चिंचवड महापालिकेतील गंभीर ‘रिंग’ झालेल्या ३६० निविदाप्रकरणात शहर अभियंता व संबंधित अधिकारी मोठ्या प्रमाणात टक्केवारी घेऊन गेले दीड वर्षे करदात्या नागरिकांच्या तिजोरीवर दिवसाढवळ्या दरोडे घालत आहेत. या गैरव्यवहाराला सर्वस्वी जबाबदार असणारे शहर अभियंता अंबादास चव्हाण व या प्रक्रियेतील कार्यकारी अभियंता, उपअभियंता यांना निलंबित करून मागील दीड वर्षातील अशा सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कार्यवाही करावी, अशी मागणी भापकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
——————

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button