breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शहरातील वनीकरण अबाधित ठेवा

 निमा संस्थेचे उद्योग मंत्र्यांना निवेदन

पिंपरी | प्रतिनिधी

शहरातील वनीकरण अबाधित रहावे. वनऔषधी उद्यान रहावे यासाठी पालिकेने एमआयडीसीला कळवून दुस-या जागेचा वापर कमर्शियल स्पेससाठी करावा अशी मागणी नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (निमा) या संस्थेने केली आहे. महाराष्ट्र उद्योग मंत्र्यांना त्याबाबत संस्थेने सविस्तर निवेदन दिले आहे. तसेच वनऔषधी उद्यानाच्या बचावासाठी पर्यावरणवादी व सेवाभावी संस्थांनी पुढकार घ्यावा असे आवाहन, निमा संस्थेचे सचिव डॉ. अभय तांबिले यांनी केले आहे.

निवेदनात नमूद केले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिकेने २००९ साली वनीकरणासाठी राखीव ठेवलेल्या मोकळ्या जागांमधून निमाला भोसरी येथील एक एकर जागा वनीकरण व वृक्षारोपणासाठी २१ वर्षाच्या कराराने दिली होती. महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये याबाबत २७ फेब्रुवारी २००८ रोजी ठराव झाला होता. ही जागा अत्यंत उंच सखल अशी होती. डम्पिंग ग्राउंड म्हणून वापरली जात होती. त्यावर संस्थेच्या सदस्यांनी मेहनत घेत साडेचारशे आयुर्वेदिक वृक्षांची लागवड करत उद्यान फुलविले आहे. झाडे आता सात ते आठ फूट उंचीची झाली आहेत. मात्र, एके दिवशी काही व्यक्तींनी येवून जागा एमआयडीसीने विकली असल्याचे सांगत जागेवर ताबा मिळविण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (निमा)चे सचिव डॉ. अभय तांबिले यांनी दिली.

निमा संस्थेच्या सदस्यांनी माहितीच्या अधिकारामध्ये माहिती मागविली. त्यामध्ये ही जागा एमआयडीसीच्या मालकीची असून ती एमआयडीसीने ओपन स्पेस म्हणून वनीकरणासाठी महापालिकेच्या ताब्यात दिली होती. महापालिकेने ही जागा निमा संघटनेला २१ वर्षांच्या कराराने वनीकरणासाठी दिली; मात्र २०१६ मध्ये एमआयडीसीने महापालिकेशी संपर्क न साधता, पालिकेचे अधिकारी हजर नसताना ताब्यात घेतली. तसेच वनीकरणासाठी असलेल्या या जागेला कमर्शियल स्पेस म्हणजेच सीएम मध्ये रुपांतरित करत तिची विक्री केली. ज्यांना ही जागा विकली आहे. त्यांनी पालिकेकडे ही झाडे काढून टाकण्याची विनंती केली आहे. आम्ही कष्टाने उद्यान फुलविले आहे. हे उद्यान वाचविण्यासाठी शहरातील संस्थांनी पुढाकार घ्यावा अशी मागणी या वेळी निवेदनाद्वारे केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button