breaking-newsराष्ट्रिय

शबरीमला भक्तांचे आंदोलन बळाने चिरडल्यास गंभीर परिणाम : शहा

केरळात शबरीमला मंदिरात सर्वच वयोगटातील महिलांना प्रवेश देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात अय्यपा भक्तांनी सुरू केलेले आंदोलन डाव्यांचे सरकार बळाने चिरडून टाकत आहे, असा आरोप भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी केला असून या आंदोलनास पाठिंबा देत एकप्रकारे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचाही जाहीर अनमान केला आहे.

२०१९मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत केरळात जनाधार मिळवण्याचा प्रयत्न म्हणून अखेर धार्मिक मुद्दय़ाचाच वापर भाजपला करावा लागत आहे. मात्र देशभरातील जागृत स्त्री मतदारांवर त्याचे उलट परिणाम होण्याची शक्यताही चर्चेत आहे.

भाजप जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन करताना शहा म्हणाले की, दोन हजार भक्तांना अटक झाली असून त्यात संघ स्वयंसेवकांचा समावेश आहे. शहा यांनी अय्यप्पा मंत्राने भाषणाची सुरुवात केली, ते म्हणाले की, ही दडपशाही सुरू राहिली तर पिनारायी विजयन यांच्या सरकारला मोठी किंमत मोजावी लागेल. राज्यातील महिलाही सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात आहेत. डावे सरकार शबरीमला मंदिर आणि हिंदू परंपरा यांचा नाश करण्याच्या प्रयत्नात असून भाजप त्यांना हिंदूंच्या श्रद्धांशी खेळ करू देणार नाही.

आश्रमावर गुंडांचा हल्ला

महिलांच्या मंदिर प्रवेशाचे समर्थन करणारे स्वामी संदीपानंद गिरी यांच्या आश्रमावर शनिवारी पहाटे गुंडांनी हल्ला चढवला. त्यात दोन मोटारी आणि एक दुचाकी पेटवून देण्यात आली. स्वामी यावेळी आश्रमात होते. हा हल्ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेच घडविल्याचा मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचा आरोप आहे. मुख्यमंत्री विजयन यांनी आश्रमास तातडीने भेट दिली. विचारांना विरोध असू शकतो, मात्र तो वैचारिक मार्गाने करण्याची पात्रता नसलेलेच हल्ले करतात हे वारंवार दिसून आले आहे, असा टोलाही त्यांनी हाणला. संदीपानंद गिरी यांनी या हल्ल्याला भाजप प्रदेशाध्यक्ष पी. एस. श्रीधरन पिल्ले , शबरीमलाचे पारंपरिक आचार्य थाळामन माडोम आणि पंडालम राजघराण्याचे वारस जबाबदार असल्याचा आरोप केला आहे.

भेदाचे कारण काय?

अय्यप्पाच्या इतर कुठल्याही मंदिरात महिलांना प्रवेश बंदी नाही, असे शहा यांनीच सांगितले. त्यामुळे शबरीमलातील मंदिरात  प्रवेशबंदीचा भेद का, याचे कारणही त्यांनी स्पष्ट केले नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button