breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

विरोधकांच्या १५ वर्षांपेक्षा भाजपची ४ वर्षे सरस

व्यासपीठावर चर्चा करण्याचे मुख्यमंत्र्यांचे विरोधकांना आव्हान

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारला १५ वर्षांत जमला नाही इतका विकास राज्यातील भाजप-शिवसेना सरकारने गेल्या चार वर्षांत केला असून जाहीर व्यासपीठावर कामगिरीची तुलना करण्यासाठी समोर येण्याचे आव्हान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना दिले. त्याचबरोबर मतदारांशी वैयक्तिक संपर्क ही भाजपची ताकद असून कार्यकर्त्यांनी प्रत्येकाशी संपर्क साधून सरकारची कामगिरी पोहोचवली तरी २०१४ पेक्षा जास्त मते मिळवून केंद्रात व राज्यात पुन्हा भाजपची सत्ता येईल, असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला.

भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात झाली. बैठकीचा समारोप मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भाषणाने झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शौचालय बांधणी, घरबांधणी, स्वयंपाकाचा गॅस, वीज पोहोचवून कोटय़वधी लोकांच्या जीवनात परिवर्तन आणले. आयुष्मान भारत योजनेतून देशभरातील ५० कोटी लोकांना चांगली आरोग्य सेवा मिळेल, असे फडणवीस म्हणाले.

विकास, चांगला कारभार, पायाभूत सुविधांचा विकास अशा कोणत्याच मुद्दय़ावर भाजप सरकारच्या समोर उभे राहता येणार नाही, स्पर्धा करता येणार नाही म्हणून भ्रम पसरवण्याचे, खोटे आरोप करण्याचे काम विरोधकांनी सुरू केले आहे. पण त्यामुळे कार्यकर्त्यांनी घाबरण्याचे कारण नाही. केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा थेट लाभ मिळालेले जवळपास दोन कोटी लोक महाराष्ट्रात आहेत. मागील निवडणुकीत दीड कोटी मते भाजपला मिळाली होती. आता या दोन कोटी लोकांपर्यंत पोहोचून भाजप सरकारमुळे त्यांना झालेल्या लाभाची आठवण करून दिली तरी ही सर्व मते भाजपला मिळतील. वैयक्तिक संपर्क हे आपले सामथ्र्य आहे हे लक्षात ठेवा, असा कानमंत्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना दिला. राफेल विमानाच्या खरेदीवरून काँग्रेस खोटे आरोप करीत आहे असे त्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्र्यांकडून कामगिरीचा आढावा

काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार गेले तेव्हा ३२ लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली होते. भाजप सरकारने ४ वर्षांत त्यात तब्बल १३ लाख हेक्टरची भर घातली. शुल्क नियामक प्राधिकरणाच्या माध्यमातून खासगी महाविद्यालयांची शुल्कवाढ नियंत्रित करून विद्यार्थ्यांचे ३ हजार कोटी रुपये वाचवले, कृषी खात्यातर्फे दरवर्षी अडीच हजार कोटी रुपये खर्च केले जात होते. भाजप सरकारने ती रक्कम ५५०० कोटी रुपयांवर नेली. काँग्रेस-राष्ट्रवादीने १५ वर्षांत शेतकऱ्यांना थेट मदत ७ हजार कोटी रुपयांची केली होती. भाजपने ४ वर्षांत १६ हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले. १५ वर्षांत केवळ ४५० कोटी रुपयांचे धान्य खरेदी केले होते. भाजप सरकारने ४ वर्षांत ८२०० कोटी रुपयांचे धान्य खरेदी केले, अशी आकडेवारी मांडत मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाजप सरकारची ही कामगिरी लोकांपर्यंत पोहोचवा, असे कार्यकर्त्यांना सांगितले.

कदम मिला के चलना होगा..

दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कदम मिलाके चलना होगा या कवितेचा संदर्भ देत भाजप कार्यकर्त्यांनी त्याचे पालन केल्यास केंद्रात व राज्यात पुन्हा कमळ फुलेल. शिवसेनेशी भाजपचे चांगले संबंध आहेत. सर्वाना सोबत घेऊन जाण्याची पक्षाची भूमिका असून त्यातून मागच्या निवडणुकीपेक्षाही जास्त जागा मिळतील, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button