breaking-newsक्रिडा

विम्बल्डन टेनिस स्पर्धा : वॉवरिन्काचा दिमित्रोव्हवर आश्‍चर्यकारक विजय

  • तात्याना मारिया, डोन्ना वेकिक यांचे सनसनाटी विजय 

लंडन – गेल्या काही दिवसांत सूर हरवलेल्या स्टॅनिस्लास वॉवरिन्काने सहाव्या मानांकित ग्रिगोर दिमित्रोव्हविरुद्ध पहिला सेट केवळ 23 मिनिटांत गमावल्यानंतर आश्‍चर्यकारक पुनरागमन करताना सनसनाटी विजयाची नोंद करून विम्बल्डन टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीत दुसरी फेरी गाठली. त्याचबरोबर तात्याना मारिया, डोन्ना वेकिक आणि कॅटरिना सिनियाकोव्हा या बिगरमानांकित महिला खेळाडूंनी, तसेच गेन मॉन्फिल्स व आन्द्रे मेदवेदेव्ह या पुरुष खेळाडूंनी सरस मानांकित खेळाडूंवर मात करताना पहिला दिवस गाजविला.

पाचवा मानांकित डेल पोट्रो, 22वी मानांकित योहाना कॉन्टा, 17वी मानांकित ऍश्‍ले बार्टी, समंथा स्टोसूर व 26वी मानांकित दारिया गाव्हरिलोव्हा या प्रमुख खेळाडूंनी पहिल्या फेरीची वेस ओलांडली. अर्थात पहिल्या फेरीचा मानकरी ठरला तो स्टॅनिस्लास वॉवरिन्काच. तीन वेळा ग्रॅंड स्लॅम जिंकणाऱ्या वॉवरिन्काचे मानांकन गुडघ्यावरील शस्त्रक्रियेनंतर आता थेट 224 पर्यंत घसरले आहे. इतकेच नव्हे तर गेल्या सुमारे वर्षभरात त्याला ग्रॅंड स्लॅम स्पर्धेत पहिली फेरीही ओलांडता आलेली नाही. विम्बल्डनच्या पहिल्या फेरीतही वॉवरिन्काने सहाव्या मानांकित ग्रिगोर दिमित्रोव्हविरुद्ध पहिला सेट 1-6 असा केवळ 23 मिनिटांत गमावला, तेव्हा आणखी एका पराभवाची मानसिक तयारी सर्वांनीच केली होती.
परंतु या स्थितीतूनही विजय मिळविता येईल, असा विश्‍वास केवळ वॉवरिन्कालाच होता हे पुढच्या काही वेळात सिद्ध झाले. दुसरा आणि तिसरा सेट टायब्रेकरमध्ये जिंकणाऱ्या वॉवरिन्काने चौथा सेट जिंकत 1-6, 7-6, 7-6, 6-4 अशी बाजी मारली तेव्हा सर्व उपस्थितांनी त्याचे उभे राहून अभिनंदन केले. गेल्या वर्षीच्या विम्बल्डननंतर ग्रॅंड स्लॅम स्पर्धेतील त्याचा हा केवळ दुसरा विजय ठरला.

दरम्यान वॉवरिन्काची प्रेयसी आणि क्रोएशियाची अव्वल खेळाडू डोन्ना वेकिक हिनेही त्याच्या पावलावर पाऊल ठेवताना चतुर्थ मानांकित स्लोन स्टीफन्सचा 6-1, 6-3 असा पराभव करून खळबळजनक विजयासह महिला एकेरीची दुसरी फेरी गाठली. त्यामुळे वॉवरिन्का भलताच खूष होता. आम्हा दोघांसाठी आजचा दिवस झकास गेला, असे सांगतानाच पुढच्या आव्हानांबद्दल त्याने आशावाद व्यक्‍त केला. अन्य लढतींमध्ये जर्मनीच्या तात्याना मारियाने पाचव्या मानांकित एलिना स्विटोलिनावर 7-6, 4-6, 6-1 अशी सनसनाटी मात करीत दुसरी फेरी गाठली. तर कॅटरिना सिनियाकोव्हाने 16व्या मानांकित कोको वान्डेवेघेला 6-7, 6-3, 8-6 असे चकित केले. तसेच सोराना सिर्स्टियाने 19व्या मानांकित मॅग्दालेना रिबारिकोव्हावर 7-5, 6-3 अशी मात करीत दुसरी फेरी गाठली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button