breaking-newsपुणेमहाराष्ट्र

विनापरवाना दणदणाट

ढोलताशा पथकांविरुद्ध स्थानिकांच्या पोलिसांकडे तक्रारी

पुणे : नदीपात्रातील मोकळ्या जागेत ढोल-ताशा पथकांनी गेल्या पंधरा दिवसांपासून सराव सुरू केला आहे. गणेशोत्सवासाठी ढोल-ताशा पथकांकडून दररोज सायंकाळी सुरू करण्यात आलेला सराव स्थानिकांच्या दृष्टीने डोकेदुखी ठरला आहे. या भागात सराव करणाऱ्या पथकांना पोलिसांनी अद्याप परवानगी दिली नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

गणेशोत्सव महिन्याभरावर येऊन ठेपला असून यंदा गणेशोत्सवाचा प्रारंभ २ सप्टेंबर रोजी होणार आहे. वैभवशाली परंपरा असलेल्या पुण्याच्या गणेशोत्सवात ढोल-ताशा पथके आकर्षणाचा विषय ठरतात. सर्वोच्च न्यायालयाने ध्वनिवर्धकाबाबत काही निर्देश दिल्यानंतर अनेक मंडळांनी ढोल-ताशा पथकांना पसंती दिल्याने गेल्या काही वर्षांपासून शहरात ढोल-ताशा पथकांची संख्या वाढू लागली आहे. ढोल-ताशा पथकांमध्ये अनेक शालेय तसेच महाविद्यालय विद्यार्थ्यांचा सहभाग वाढत आहे. गेल्या पंधरवडय़ापासून नदीपात्रातील रस्त्यावर ढोल-ताशा पथकांनी मोकळ्या जागेत मांडव उभारून सराव सुरू केला आहे.

ढोल-ताशा पथकांकडून दररोज सायंकाळी सराव करण्यात येत असून दणदणाटामुळे स्थानिकांना विशेषत: ज्येष्ठ नागरिकांना त्रास होत असल्याच्या तक्रारी शनिवार तसेच नारायण पेठ भागातील रहिवाशांनी केल्या आहेत. नदीपात्रातील रस्ता डेक्कन पोलीस ठाण्याच्या हद्दीत समाविष्ट होतो. याबाबत डेक्कन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड म्हणाले, की नदीपात्रात ढोल-ताशा पथकांकडून सराव करण्यात येत असल्याचे समजले आहे. अद्याप नदीपात्रात सराव करणाऱ्या एकाही पथकाला पोलिसांनी परवानगी दिलेली नाही. सरावासाठी पोलिसांची परवानगी आवश्यक आहे. पोलिसांच्या  परवानगीशिवाय सराव करणाऱ्या पथकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

नदीपात्रातील रस्त्यावर बेशिस्त पार्किंग

डेक्कन जिमखाना, कोथरूड, एरंडवणे भागाकडे जाणारे दुचाकीस्वार नदीपात्रातील रस्त्याचा पर्यायी मार्ग म्हणून वापर करतात. नदीपात्रातील रस्त्यावर सरावसाठी येणाऱ्या तरुणांकडून दुचाकी वाहने लावली जातात. दुचाकी बेशिस्त पद्धतीने लावण्यात येत असल्यामुळे वाहतूक संथगतीने होत असल्याचे नागरिकांनी सांगितले.

पथकांचा दणदणाट

गेल्या काही वर्षांपासून संपूर्ण शहरात ढोल-ताशा पथकांचे पेव फुटले आहे. उपनगरातील मोकळ्या जागेत सध्या ढोल-ताशा पथकांकडून सुरू करण्यात आला आहे. एरंडवणे भागातील डीपी रस्त्यावरील विविध मंगलकार्यालयांमध्ये (लॉन) ढोल-ताशा पथकांचा सराव सुरू आहे. ढोल-ताशांच्या दणदणाटामुळे नागरिकांना त्रास होत असून तक्रार कोणाकडे करायची हा देखील प्रश्न आहे. अनेक पथकांना राजकीय पक्षांचे पाठबळ असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यास मर्यादा येत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button