breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

विद्यार्थ्यांनी ज्ञानसाधनेच्या क्षेत्रात यश संपादन करून शहराच्या लौकिकात भर घालावी – महापौर उषा ढोरे

पिंपरी / महाईन्यूज

शालेय जीवनात विविध पातळीवर मिळविलेले यश भावी आयुष्यासाठी चांगली दिशा देणारे असते. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत आयोजित शिष्यवृत्ती परीक्षेत प्राप्त केलेले यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे. विद्यार्थ्यांनी ज्ञानसाधनेच्या क्षेत्रात कठोर परिश्रमाने यश संपादन करुन शहराच्या नावलौकिकात भर घालावी, असे आवाहन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले.

सन २०१९-२०२० मध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली होती. यामध्ये महापालिकेच्या विविध शाळेतील एकूण २१ विद्यार्थ्यांनी विशेष यश संपादन करून जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान पटकविले आहे. या विद्यार्थ्यांचा पुस्तक, स्मृतीचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन विशेष सत्कार आज महापौर ढोरे यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी त्या बोलत होत्या. महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनात झालेल्या या कार्यक्रमास उपमहापौर केशव घोळवे, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, नगरसदस्य माउली थोरात, संदिप वाघेरे, उपआयुक्त चंद्रकांत इंदलकर, शिक्षण मंडळाच्या प्रशासन अधिकरी जोत्स्ना शिंदे, शिक्षण अधिकारी पराग मुंढे, पर्यवेक्षक रविंद्र शिंदे, सुनिल लांघी, रजीया खान, अनिता जोशी, राजेंद्र कांगोडे, राम लिंबे, विलास पाटील यांच्यासह मुख्याध्यापक, शिक्षक आणि पालक आदी उपस्थित होते.

महापालिका शाळांमधील विद्यार्थी आपली गुणवत्ता सिध्द करुन इतरांसमोर आदर्श उभा करीत आहेत ही अभिमानाची बाब आहे. विद्यार्थ्यांच्या यशामुळे महापालिका शाळांकडे बघण्याचा दृष्टीकोन सकारात्मक होईल. विद्यार्थी हे या देशाचे भविष्य असून त्यांच्या कार्यकर्तृत्वावर देशाची जडणघडण अवलंबून असते, असे नमूद करून महापौर ढोरे म्हणाल्या, विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सोयी सुविधा शहरात विकास कामांच्या माध्यमातून उभारण्यासाठी महापालिका सातत्याने प्रयत्नशील असते. विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात सहभाग नोंदवत यश संपादन केल्यास त्यांचे भविष्य निश्चितपणे उज्वल होईल.

उपमहापौर केशव घोळवे म्हणाले, विद्यार्थी हे आपले शक्तीस्थाने आहेत. भारताचे भविष्य त्यांच्या हातात आहे. विद्यार्थ्यांनी राष्र्ट प्रथम मानुन स्वत:ला त्यानंतर समजावे. त्यामुळे देश प्रगतीपथावर नक्कीच जाईल.

स्थायी समिती सभापती संतोष लोंढे म्हणाले, विद्यार्थ्यांचे यश इतरांसाठी प्रेरणादायी असुन महापालिका शाळांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी महापालिका कटीबद्ध आहे.

महापालिकेच्या १०५ प्राथमिक शाळा आणि १८ माध्यमिक शाळा आहेत. यामध्ये इयत्ता ५ वी साठी मराठी माध्यम, उर्दू, इंग्रजी, हिंदी, माध्यमिक गटातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यातील १६ विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत झळकले. यामध्ये अंजली त्रिमुखे, अनुसया स्वामी, वैष्णवी सगर, राम कुलकर्णी, स्नेहा मालकट्टे, कलावती जमादार (पिंपळे गुरव प्राथमिक शाळा), प्राजक्ता डोंगरे (मोशी कन्या प्राथमिक शाळा), आकाश कश्यप (मोशी मुले प्राथमिक शाळा), रोहन जगताप (वाकड मुले प्राथमिक शाळा), मोहम्मद मसूद खान, हुजेफा शमीम (मरहूम फकिरभाई पानसरे उर्दू प्राथमिक शाळा), सुदीप सुर्यवंशी (शेवंताबाई जगताप प्राथमिक शाळा वैदू वस्ती), सुहानी मोहिते (कुदळवाडी प्राथमिक शाळा), सिध्दार्थ गायकवाड (बोराडेवाडी प्राथमिक शाळा), मिजबा पटेल, उत्कर्ष कांबळे (मुले मुली २/२ निगडी) यांचा समावेश आहे.

इयत्ता ८ वी साठी मराठी माध्यम, उर्दू, इंग्रजी, हिंदी, माध्यमिक गटातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यातील ५ विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत झळकले. यामध्ये गौरी वाघमारे (थेरगाव माध्यमिक विद्यालय), शाम हांगे, ज्ञानसागर मिसाळ (जाधववाडी मुले प्राथमिक शाळा), अनिल केवट (छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालय भोसरी), प्रतिज्ञा हुलावळे (मोशी कन्या प्राथमिक शाळा) यांचा समावेश आहे.

या सर्व गुणवंत विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक, मुख्याध्यापक, पर्यवेक्षक आणि पालकांचे देखील महापौर ढोरे यांनी अभिनंदन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिष्यवृत्ती परिक्षा समन्वयक सुभाष सुर्यवंशी यांनी केले तर सूत्रसंचालन जनतासंपर्क अधिकारी किरण गायकवाड यांनी केले. आभार प्रशासन अधिकरी जोत्स्ना शिंदे यांनी मानले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button