breaking-newsमनोरंजनराष्ट्रिय

वादांमुळे मला फरक पडत नाही, नुसरत जहाँचे इस्लामिक धर्मगुरूंना उत्तर

“देवाची माझ्यावर विशेष कृपा असून वादांमुळे मला फरक पडत नाही” असे तृणमूल काँग्रेसच्या खासदार व प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री नुसरत जहाँ यांनी स्पष्ट केले आहे. कोलकात्यात दुर्गा पूजा उत्सवात सहभागी झाल्याबद्दल उत्तर प्रदेशातील मुस्लीम धर्मगुरूंनी त्यांना लक्ष्य केले होते. “देवाची माझ्यावर विशेष कृपा आहे. मी सर्व सण साजरे करते. मी मानवतेचा आदर करते. मी माझ्या आयुष्यात खूप आनंदी आहे. वादांमुळे मला फरक पडत नाही” असे नुसरत जहाँ म्हणाल्या.

नुसरत जहाँ कोलकात्यातील चालताबागान दुर्गा पूजा मंडपात बंगाली हिंदू परंपरेचा भाग असलेल्या ‘सिंदूर खेला’ मध्ये पती निखिल जैनसोबत सहभागी झाल्या होत्या. दुर्गा पूजा उत्सावात गेल्याबद्दल उलेमा-ई-हिंदचे उपाध्यक्ष मुफ्ती असद कासमी यांनी नुसरत जहाँ यांच्यावर टीका केली होती. नुसरत जहाँ यांनी आपले नाव आणि धर्म बदलून घ्यावा. त्या इस्लाम आणि मुस्लिमांची बदनामी करत आहेत असे मुफ्ती असद कासमी म्हणाले होते.

“नुसरत जहाँनी पूजा करणे अजिबात नवीन नाही. इस्लामच्या अनुयायांना फक्त अल्लाची पूजा करण्याचे आदेश असतानाही नुसरत जहाँ हिंदू देवतांची पूजा करतात. त्यांनी जे केले ते पाप आहे” असे हे धर्मगुरु म्हणाले होते. त्यांनी धर्माबाहेर लग्न केले. त्यामुळे त्यांनी त्यांचे नाव आणि धर्म बदलावा असे मुफ्ती असद कासमी म्हणाले.

देवबंदमधल्या उलेमांनी नुसरत जहाँ इस्लामविरोधी काम करत असल्याची टीका केली होती. “जर नुसरत जहाँला इस्लामच्या शिकवणीविरुद्ध जाणारी कामे करायची असतील तर तिने प्रथम आपले नाव बदलले पाहिजे. अशा प्रकारे वागून ती इस्लाम धर्माचा अपमान का करत आहे,” असा प्रश्न उलेमांनी विचारला होता. नुसरतने यापूर्वीही पूजा केली आहे. अशाप्रकारच्या कृत्याला इस्लाम धर्मात बिलकूल परवानगी नाही, असे उलेमांचे म्हणणे आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button