breaking-newsमुंबई

वातानुकूलित लोकलसाठी सामान्य लोकलवर गदा?

  • प्रवासी संघटनांचा विरोध

पश्चिम रेल्वेवर सामान्य लोकल फेऱ्यांऐवजी वातानुकूलित लोकल फेऱ्या चालवण्यात आल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. मध्य रेल्वेही नव्या वातानुकूलित लोकलबाबत हाच कित्ता गिरवणार आहे. सामान्य लोकलच्या फेऱ्या रद्द न करता वातानुकूलित लोकलच्या अतिरिक्त फेऱ्या चालवण्यात याव्यात, अशी मागणी शुक्रवारी १३ प्रवासी संघटनांनी मध्य रेल्वेकडे केली.

२५ डिसेंबर २०१७ रोजी पश्चिम रेल्वेवर पहिली वातानुकूलित लोकल धावली. चर्चगेट ते बोरिवली, विरार मार्गावर ही लोकल चालवताना सध्याच्या एका सामान्य लोकलच्या बारा फेऱ्यांऐवजी वातानुकूलितच्या बारा फेऱ्या चालवण्यात आल्या. परंतु चर्चगेट ते विरापर्यंत २०५ रुपये तिकीट आणि २,०४० रुपये मासिक पास यामुळे सर्वसामान्यांच्या खिशालाच कात्री लागणार असल्याने त्याला विरोध झाला. सामान्य लोकलच्या प्रथम श्रेणी प्रवाशांना वातानुकूलित लोकलमधून प्रवास करण्यासाठी तिकिटातील फरक देऊन प्रवासाची मुभा देण्यात आली. प्रवाशांच्या रोषाकडे दुर्लक्ष करून पश्चिम रेल्वे आपल्या भूमिकेवर ठाम राहिली. मध्य रेल्वेही आता हीच भूमिका घेण्याचा तयारीत आहे. मध्य व पश्चिम रेल्वेला या वर्षांत ‘भेल’ कंपनीची उपकरणे असलेल्या प्रत्येकी सहा वातानुकूलित लोकल मिळतील. पहिली लोकल पश्चिम रेल्वेला मिळेल आणि त्यानंतर दुसरी लोकल मध्य रेल्वेवर मे महिन्यापर्यंत येणार आहे. या लोकलच्या चाचण्या घेण्यात येतील व त्यानंतर कोणत्या मार्गावर वातानुकूलित लोकल चालवणे शक्य आहे ते निश्चित केले जाईल.

रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार सामान्य लोकलच्या १०-१२ फेऱ्यांऐवजी वातानुकूलित लोकलच्या फेऱ्या चालवण्यात येतील. त्याशिवाय मध्य रेल्वेसमोर पर्याय नाही. एखादी नवीन फेरी सुरू करताना वेळापत्रकात बरेच बदलही करावे लागतात. वातानुकूलित लोकलसाठीही तेच करावे लागणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

वातानुकूलित लोकल चालवताना सामान्य लोकलच्या फेऱ्या रद्द करू नयेत, अशी मागणी १३ रेल्वे प्रवासी संघटनांनी मध्य रेल्वे प्रशासनाकडे केली आहे. वातानुकूलित लोकलच्या अतिरिक्त फेऱ्या चालवा आणि प्रवाशांना दिलासा द्या, असेही त्यात नमूद करण्यात आले आहे, असे मुंबई यात्री संघाचे अध्यक्ष सुभाष गुप्ता यांनी सांगितले.

मध्य रेल्वेवर वातानुकूलित लोकलच्या वेळापत्रकाची अंमलबजावणी पश्चिम रेल्वेप्रमाणे करू नये. सर्वसामान्य प्रवाशांना कोणताही त्रास होऊ न देता, नव्या लोकलच्या प्रवाशांना सुविधा देण्यात याव्यात.

– नंदकुमार देशमुख, अध्यक्ष, उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता महासंघ

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button