वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेना पत्र
नवी दिल्ली – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावरून शुभेच्छा दिल्या आहेत. ‘महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. उद्धवजींच्या दीर्घ आणि निरोगी आयुष्यासाठी मी प्रार्थना करतो’, असे ट्वीट पंतप्रधान मोदी यांनी केले आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्रही पाठवले आहे.
‘वाढदिवस हा गतकाळातल्या स्मृतींना उजाळा देण्याचा दिवस असतो, त्याबरोबरच हा दिवस म्हणजे एक संधी असते भविष्याची रूपरेषा निश्चित करण्याची. मला विश्वास आहे की आजचा दिवस राज्य आणि देश विकासाच्या संकल्पसिद्धीसाठी आपल्याला अधिक बळ देईल. आपल्याला वाढदिवसानिमित्त मी ईश्वराकडे हीच प्रार्थना करेन की त्याने आपल्याला आनंदी आणि आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य द्यावे’, असे मोदींनी म्हटले आहे.