breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

लष्करी हद्दीतून काटे-झिंजुर्डे मळा रस्त्यावर येणा-या पाण्याचा प्रश्न ‘अधांतरीच’

  • महापालिका आणि लष्करी प्रशासनात समन्वयाचा अभाव
  • समस्या न सुटणे म्हणजे स्थानिक नगरसेवकांचे अपयश

पिंपरी / प्रतिनिधी

पिंपळे सौदागर येथील झिंजुर्डे मळा भागातील रस्त्यावर लष्कर हद्दीतील पावसाचे पाणी येते. दरवर्षी पावसाळ्यात याठिकाणी तळे साचत असल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडते. पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासन, सत्ताधारी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नगरसेवक लष्कर प्रशासनासोबत समन्वय साधून यावर तोडगा काढत नसल्यामुळे रहिवाशांचे हाल सुरू आहेत. केवळ डागडुजीच्या कामावर चमकोगिरी करणा-या चारी नगरसेवकांना ही समस्या दिसत नाही का ?, असा सवाल नागरिक करत आहेत.

पिंपळे सौदागर येथील काटे झिंजुर्डे मळा आणि लष्कराची हद्द एकमेकांना लागून आहे. याठिकाणी सुमारे एक हजार घरांची लोकवस्ती आहे. चार दिवसांपूर्वी पावसाचा जोर वाढल्यामुळे लष्कराच्या हद्दीतील पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात लोकवस्तीत आले. २०० एकर डिफेन्स लँडचा लोकवस्तीकडे उतार असल्यामुळे हे पाणी नागरिकांच्या घरासमोर रस्त्यावर जमा झाले. त्यामुळे विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिकांना गुडघाभर पाण्यातून वाट काढत पायी चालत जावे लागले. वाहनचालकांना पाण्यातून मार्ग काढावा लागला. मुळात हे पाणी जाण्यासाठी कासारवाडी ते जगताप डेअरी ‘बीआरटी’ मार्गिकेच्या खालून भूमिगत असलेल्या जलवाहिकेची क्षमता कमी असल्यामुळे हे पाणी लष्कर हद्दीतून मुख्य रस्त्यावर येते. मुख्य रस्त्यावरून पाणी जाण्यासाठी मार्ग नसल्यामुळे या भागाला तळ्याचे स्वरुप प्राप्त होते. दरम्यानच्या काळात या भागातील नागरिकांचे जीवनमान पूर्णपणे विस्कळीत होते. दरवर्षी या भागातील नागरिकांना या समस्येचा कटाक्षाने सामना करावा लागतो.

दरम्यान, स्थानिक नगरसेवक याठिकाणी येऊन समस्या जाणून घेण्याची तयारी देखील दाखवत नाहीत. केवळ राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी सोयीच्या भागाकडे त्यांचे लक्ष असते, आमच्या भागामध्ये चारपैकी एकही नगरसेवक फिरकत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. तसेच, पिंपळे सौदागरचा स्मार्ट सिटीत समावेश असून पॅन सिटीचे काम युध्द पातळीवर सुरू असल्याची टिमकी आयुक्त श्रावण हर्डीकर वारंवार वाजवत असतात. स्मार्ट सिटीतील रस्त्याचीच जर अशी अवस्था असेल तर शहराच्या इतर भागातील नागरिकांनी विकासासाठी सत्ताधा-यांच्या भुलथापांना बळी पडणे नुकसानकारक ठरेल. स्मार्ट सिटीचे गाजर आम्हाला दाखवून नका, पहिले रस्त्यावरील साचणा-या पाण्याचा प्रश्न कायमचा सोडवा, अशा सूचना नागरिकांनी पालिका प्रशासन आणि नगरसेवकांना केल्या आहेत.


…अन्यथा नगरसेवकांना भोगावे लागेल

गेल्या कित्येक वर्षांपासून या प्रश्नाचे भिजत घोंगडे राहिले आहे. स्थानिक नगरसेवकांच्या वेळकाढूपणामुळे नागरिकांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. या प्रभागाकडे महापौर पदासमान दर्जाचे म्हणजेच विरोधी पक्षनेते पद असताना देखील हा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न झाले नाहीत. विरोधी पक्षनेते नाना काटे यांना हा प्रश्न सोडविण्याची नामी संधी होती. मात्र, त्यांनी या प्रश्नासाठी लक्ष घातले नाही, अशी खंत नागरिकांनी व्यक्त केली. भाजप महापौर माई ढोरे यांनी याप्रश्नी सकारात्मक पाउल उचलले होते. लष्करी अधिकाऱ्यांशी बैठकीची तयारी केली होती. मात्र, प्रभागातील चारही नगरसेवकांनी याबाबत उदासिनता दाखविल्यामुळे यावर तोडगा निघू शकला नाही, असेही नागरिकांनी सांगितले. या मुद्याचे राजकारण न करता लष्करी अधिकारी, पालिका प्रशासन आणि चार नगरसेवकांनी एकत्रीतरित्या समोपचाराने नागरिकांची या समस्येतून सुटका करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. अन्यथा याचे वाईट परिणाम भोगावे लागतील, असा इशारा नागरिकांनी स्थानिकच्या चारही नगरसेवकांना दिला आहे.


यासंदर्भात लष्कर आणि महापालिका प्रशासन यांच्यात चारवेळा बैठका पार पडल्या. प्रत्येक वेळी झिंजुर्डे मळा रस्त्यालगतच्या लष्करी हद्दीचाच मुद्दा उपस्थित होतो. महापालिकेतील नगररचना विभाग आणि लष्करी प्रशासन यांच्यात ‘जॉईन्ट व्हेंचर’ पार पडले आहे. त्यावर स्वाक्षरी राहिल्या आहेत. स्वाक्षरी झाल्यानंतर रस्ताचे काम मार्गी लागेल. लष्करी हद्दीतील पावसाचे पाणी निचरा होण्यासाठी ‘बीआरटी’ मार्गिकेच्या खालून 1400 ची लाईन टाकण्यात येत आहे. पुढील 4 महिन्यात रस्त्याचे काम मार्गी लागेल, त्यासाठी लष्कर प्रशासनाने सकारात्मकता दाखविली आहे”.

देवान्ना गट्टूवार, कार्यकारी अभियंता

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button