पिंपरी l प्रतिनिधी
बँकेत कामाला असल्याचे खोटे सांगून लग्न केले. त्यानंतर विवाहितेच्या आईचे दागिने गहाण ठेऊन तिचा छळ केला. विवाहितेच्या मोबाईलवरून अश्लील स्टेट्स ठेऊन तिची नातेवाईकांमध्ये बदनामी केली. विवाहितेच्या बहिणीसोबत गैरवर्तन करून विनयभंग केला. याप्रकरणी पती, सासू आणि सासरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी 29 वर्षीय आरोपी पतीला अटक केली आहे. हा प्रकार डिसेंबर 2018 ते 17 एप्रिल 2022 या कालावधीत इंद्रायणीनगर, भोसरी येथे घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पती हा बँकेत कामाला असल्याचे खोटे सांगून त्याने फिर्यादी विवाहीतेसोबत लग्न केले. फिर्यादीला माहेरहून पैसे आणण्यासाठी तसेच फिर्यादीच्या चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण व शिवीगाळ केली. आरोपी पतीने फिर्यादीचा मोबाईल वापरण्यासाठी घेतला. त्यावरून अश्लील स्टेटस ठेऊन फिर्यादीची नातेवाईकांमध्ये बदनामी केली. फिर्यादी यांच्या आईने दिलेले 21 तोळे दागिने गहाण ठेऊन परत न करता फसवणूक केली. फिर्यादीच्या बहिणीसोबत गैरवर्तन करून आरोपीने तिचा विनयभंग केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.