breaking-newsमुंबई

लग्नास नकार देणाऱ्या तरुणीला अॅसिड हल्ल्याची धमकी; बँक कर्मचाऱ्याला अटक

महिला सहकाऱ्याने लग्नास नकार दिल्याने संतापलेल्या तरुणाने तिला अॅसिड हल्ल्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना मुंबईत घडली. या प्रकरणी पोलिसांनी अभिजित सिंह (वय ३२) या तरुणाला अटक केली असून अभिजितने पीडित तरुणीला इतका त्रास दिला की तिने शेवटी कामावर जाणेही बंद केले होते.

तक्रारदार तरुणी आणि अभिजित सिंह हे मुंबईतील एका खासगी बँकेत कामाला होते. कार्यालयातच या दोघांची ओळख झाली. काही दिवसांनी अभिजितने त्या तरुणीला लग्नाची मागणी घातली. मात्र, तरुणीने अभिजितला नकार दिला. या प्रकाराने अभिजित संतापला होता. तरुणीने अपमान केल्याची भावना त्याच्या मनात निर्माण झाली. याचा बदला घेण्यासाठी अभिजितने त्या तरुणीला त्रास द्यायला सुरुवात केली.

फेब्रुवारीमध्ये त्या तरुणीला कार्यालयातच धमकीचे पत्र येऊ लागले. मला १५ लाख रुपये दे, अन्यथा तुझ्यावर आणि तुझ्या आईवर अॅसिड हल्ला करणार, अशी धमकी त्या पत्रांमधून देण्यात आली होती. काही दिवसांनी त्या तरुणीला धमकीचे फोनही येऊ लागले होते. भीतीपोटी त्या तरुणीने घराबाहेर पडणेही बंद केले. मात्र, तरी देखील धमक्यांचे सत्र सुरुच होते. तुझे मॉर्फ केलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिल्याने तरुणीने शेवटी धाडस दाखवले आणि पोलीस ठाणे गाठले.

तरुणीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी सायबर सेलच्या मदतीने आरोपीचा शोध घ्यायला सुरुवात केली. जवळपास महिनाभर पोलिसांचे पथक आरोपीवर लक्ष ठेवून होते. अखेर अभिजित पोलिसांच्या जाळ्यात अडकला आणि त्याची रवानगी तुरुंगात झाली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button