breaking-newsपुणे

रोज सहा दुचाकींची चोरी!

  • नागरिकांना खबरदारीचे उपाय योजण्याचे पोलिसांचे आवाहन

पुणे – दुचाकींचे शहर अशी ओळख पुणे शहराने निर्माण केली आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम नसल्याने दुचाकी खरेदीचा कल दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून शहरात दुचाकींची  संख्या वाढत असून, शहरातील दुचाकींची संख्या २४ लाखांहून अधिक आहे. एकीकडे दुचाकी वाहनांची संख्या वाढत असताना शहरात दुचाकी चोरीचे प्रमाणही मोठे आहे. पुणे शहर परिसरातून दररोज पाच ते सहा दुचाकी चोरीला जात आहेत.

पोलिसांकडे दाखल होणाऱ्या तक्रारींचे अवलोकन केल्यास यंदा नोव्हेंबरअखेर पर्यंत पुणे शहरातून एक हजार ७४८ दुचाकी वाहने चोरीला गेली आहेत. दुचाकी चोरीचा आलेख वाढता असून त्या तुलनेत दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण कमी आहे. शहरात दुचाकी तसेच मोटारींची संख्या वाढत आहे. पुणे शहरात परगावाहून शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण मोठे आहे, तसेच नोकरी-व्यवसायानिमित्त स्थायिक होणाऱ्या नागरिकांचे प्रमाण वाढत आहे. सार्वजनिक वाहतूक सक्षम नसल्याने दुचाकींचा वापर वाढला आहे.

वाहनांची वाढती संख्या पाहता, शहरातील प्रमुख रस्त्यांवर दुचाकी तसेच मोटारी लावण्यास जागा उपलब्ध होत नाही. चारचाकी वाहनांच्या तुलनेत दुचाकी चोरी करणे तितकेसे अवघड नसते. त्यामुळे गेल्या काही वर्षांत शहरात दुचाकी चोरीचे प्रमाण वाढत आहे. सराईत चोरटे दुचाकी चोरून तिची विक्री शेजाऱ्याच्या जिल्हय़ात किंवा ग्रामीण भागात करतात. चोरलेल्या दुचाकींची विक्री अगदी पाच ते पंधरा हजार रुपयांमध्ये केली जाते, असे निरीक्षण अधिकाऱ्यांनी नोंदवले.

दररोज ३०० दुचाकींची भर

शहरात दुचाकी वाहनांची संख्या वाढत आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे (आरटीओ) दररोज ३०० दुचाकींची नोंद होते. महिन्याला १० ते १२ हजार दुचाकी खरेदी केल्या जात असून, महिन्याला १५०० मोटारींची नोंद आरटीओकडे होते. सणासुदीच्या काळात दुचाकी आणि चारचाकी वाहनांची खरेदी दुपटीने वाढते.

एकूणच सुरक्षा रामभरोसे!

शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत आहेत. दुचाकी चोरटय़ांना रोखण्यासाठी गुन्हे शाखेकडून वाहनचोरी प्रतिबंधक पथकाची निर्मिती करण्यात आली होती. मात्र, गुन्हे शाखेची नुकतीच पुनर्रचना करण्यात आली. त्यानंतर वाहनचोरी विरोधी पथक बंद करण्यात आले. दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. रस्त्यावर लावलेल्या दुचाकींची सुरक्षा रामभरोसे आहे. कारण चोरटे वाहनांचे हँडल लॉक तोडून  दुचाकी लांबवतात, तसेच बनावट चावीचा वापर करून दुचाकी लांबवल्या जातात. दुचाकी चोरटय़ांना अटकाव घालणारे तंत्रज्ञान अद्याप तरी विकसित झालेले नाही. पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनीदेखील दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या आहेत

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button