breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

रिंगरोड, अनधिकृत बांधकाम बाधित नागरिकांचा एल्गार, शिवसेना-भाजप विरोधात मतदान करण्याचा निर्धार

  • स्वाभिमानी घर बचाव संघर्ष चळवळीचा निर्णय
  • शिवसेना-भाजपवर बहिष्कार टाकणार

पिंपरी, ( महा ई न्यूज ) –  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी-चिंचवड शहरातील बांधित नागरिकांना दिलेला शब्द पाळला नाही. शहरातील रिंगरोड, अनधिकृत बांधकाम, सरसकट शास्तीकर माफ, नवनगर प्राधिकरणाचे आरक्षण या प्रश्नावर अद्याप निर्णय घेतला नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपवर बहिष्कार टाकून महायुतीच्या विरोधात मतदान करण्याचा निर्णय स्वाभिमानी घर बचाव संघर्ष चळवळीने घेतला आहे.

मागील लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकीच्या पुर्वी आणि सत्तेत आल्यानंतर भाजप-सेना युती सरकारने पिंपरी-चिंचवड शहरातील बाधित नागरीकांना मोठ्या प्रमाणावर आश्वासने दिली होती. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, तुमच्या घराच्या विटेला ही धक्का लागु देणार नाही. त्यानंतर वरील प्रश्नासंदर्भातील निवेदने दिली. आम्ही बाधित नागरीकांनी रस्त्यावर उतरून ऊन, वारा, पाऊस, थंडीची पर्वा न करता आंदोलने केली. मंत्रालयात जाऊन हजारो बाधित नागरीकांच्या सुचना हरकती दिल्या. मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. परंतु, त्यांनी आम्हाला आश्वासना व्यतिरीक्त आमच्या हाती काहीच आले नाही. नागपुरच्या हिवाळी आधिवेशन काळात उपोषण केले.

परंतु, शहरातील खासदार, आमदार हे निवडणुकीपुरते आमच्याकडे येतात. मात्र, बाधित नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी काहीच प्रयत्न  केलेले नाहीत. त्यानंतर आमचे प्रश्न कोरेगावचे आमदार शशिकांत शिंदे यांनी विधानसभा सभागृहात प्रश्न मांडला. त्यातही शहरातील एक ही लोकप्रतिनीधींनी त्यास अनुमोदन दिले नाही. खासदारांनी सभेत येवुन मी तुमच्या सोबत आहे, या व्यतिरीक्त काहीच केले नाही. फक्त एकदा चर्चा करतोय, असं दर्शविण्यासाठी रिंगरोडच्या विकास आराखडा (डी.पी.) प्लॅन हातात धरून मुख्यमंत्र्यांसोबत फोटो तेवढा काढला. त्यामुळे यंदाच्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत आम्ही बाधित नागरीक या लोकप्रतिनिधींना त्यांची जागा दाखवून देणार आहोत.

पिंपरी चिंचवड शहरातील कालबाह्य झालेला रिंगरोड (HCMTR 30 Mtr) रद्द करा, अशी मागणी वारंवार बाधित नागरीकांनी केलेली आहे. परंतु सत्तेचा गैरफायदा घेत शिवसेना-भाजपच्या स्थानिक नेत्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी हजारो कुटुंबांना बेघर करण्याचा घाट घातला आहे.  हजारो कुटुंबांना बेघर करून रस्त्यावर आणणारा आणि कालबाह्य झालेला रिंगरोड दोन-चार लोकांच्या फायद्यासाठी केला जात असून तो आम्ही कोणत्याही परीस्थितीत होऊ देणार नाही.

तसेच, शिवसेना-भाजप सरकारने निवडणुकीपुर्वी व निवडुन आल्यानंतर दिलेली आश्वासने पाळलेली नाहीत. त्यामुळे आम्ही रिंगरोड, सरसकट शास्तीकर, अनाधिकृत बांधकाम या प्रश्नावर बाधित नागरीक लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती विरोधात मतदान करुन यापुढे भाजप-शिवसेना युतीवर बहिष्कार टाकणार आहोत. यापुढील निवडणुकीत देखील जर आमचा जिव्हाळ्याचा प्रश्न सोडविला नाही. तर बाधित नागरीक सत्ताधा-याच्या विरोधात जाऊन काम करणार आहे. त्यामुळे नुसत्या थापा मारून चालणार नाही. दिलेली आश्वासने पाळावीच लागतील. आजपर्यंत आमच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांचे फक्त राजकारण झाले. पण, इथुन पुढे असे होऊ देणार नाही. जनता ही हुशार झाली आहे, त्यामुळे “ए पब्लिक है., ए सब जाणती है ..” हे आम्ही या निवडणुकीत नक्कीच दाखवुन देवु, असा इशारा धनाजी येळेकर, गौरव धनवे, हेमलता लांडे, सतिश काळे, विजय लोट, सविता लोयरे, खंडेराव जमादार, बालाजी ढगे आदी बाधित नागरिकांनी दिला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button