breaking-newsमहाराष्ट्रमुंबईराष्ट्रिय

राहुल यांनी मोदींना दिलेल्या आलिंगनातून चांगला संदेश – शरद पवार

राजकीय मतभेद असले तरी देशाच्या प्रगतीसाठी एकवटायला हवे 
मुंबई – कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलेल्या आलिंगनाच्या घडामोडीवर विविध स्तरांतून संमिश्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. मात्र, त्या आलिंगनातून चांगला संदेश दिला गेल्याचे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.

राहुल यांच्या आलिंगनाची भाजपबरोबरच स्वत: मोदी यांनीही यथेच्छ खिल्ली उडवली. मात्र, राहुल यांच्या कृतीचे पवार यांनी समर्थन केले आहे. मोदींनी भले माझा द्वेष करावा; पण मी तसे करणार नाही, या राहुल यांच्या वक्तव्याचीही पवार यांनी प्रशंसा केली. काल एका तरूणाने ज्येष्ठ व्यक्तीला आलिंगन दिले. त्यातून चांगला संदेश गेल्याचे जाणायला हवे. राजकीय मतभेद असले तरी देशाच्या प्रगतीसाठी प्रत्येकाने एकवटायला हवे, असे पवार येथे राष्ट्रवादीच्या मेळाव्यात बोलताना म्हणाले. यावेळी त्यांनी मोदींवरही निशाणा साधला.

निवडणुकांच्या सभा आणि सरकारी कामकाज यांतील फरक मोदींनी ओळखायला हवा. जेव्हा तुम्ही (मोदी) परदेशी जाता तेव्हा तुम्ही पंतप्रधान आणि देशाचे प्रतिनिधी असता. मात्र, तुम्ही परदेशी भूमीत देशातील राजकीय मुद्दे उपस्थित करता आणि सातत्याने एका परिवाराचा (गांधी) संदर्भ देऊन स्वदेशातील राजकीय प्रतिस्पर्ध्यांवर टीका करता. गतकाळात माझेही कॉंग्रेस नेतृत्वाशी मतभेद होते. मात्र, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, पं.जवाहरलाल नेहरू यांसारख्या कॉंग्रेस नेत्यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाचा मी नेहमीच आदर करत आलो आहे.

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी गरिबांच्या कल्याणासाठी कार्य केले. त्यांनी जागतिक व्यासपीठावर देशाची प्रतिष्ठा वाढवली. इंदिरा गांधी आणि कॉंग्रेसवर परदेशांत टीका करणे चुकीचे आहे, असे परखड प्रतिपादन पवार यांनी केले. रूपया कमजोर होत आहे. बेरोजगारी वाढली आहे. देशाची अर्थव्यवस्था अडचणीत आहे. त्यामुळे सरकारी धोरणे आणि कार्यक्रमांवर टीका व्हायलाच हवी. मात्र, टीका करताना व्यक्तिगत हल्ले टाळायला हवेत, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. जम्मू-काश्‍मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांनी काल लोकसभेत केलेल्या वक्तव्याची पवार यांनी प्रशंसा केली.

मी भारतीय म्हणून जगेन आणि मरेन ही अब्दुल्ला यांची भूमिका देशासाठी अभिमानास्पद अशीच आहे, असे ते म्हणाले.
यावेळी गोरक्षण आणि जमावाकडून होणाऱ्या हत्या यांसारख्या मुद्‌द्‌यांवरूनही पवार यांनी भाजप आणि त्या पक्षाच्या नेत्यांना लक्ष्य केले. मांसाहाराचा प्रचार करण्याचा माझा उद्देश नाही. मात्र, खाण्याच्या सवयींवरून लोकांना लक्ष्य करणे योग्य नाही. जमावाकडून होणाऱ्या हत्येच्या प्रकरणात आरोपी असणाऱ्यांचा सत्कार एका केंद्रीय मंत्र्याकडून (जयंत सिन्हा) केला जातो. त्यातून केंद्र सरकार कुठला संदेश देऊ इच्छित आहे, असा सवाल त्यांनी केला.

यावेळी व्यासपीठावर उपस्थित असलेले आणि दोन वर्षे तुरूंगात रहावे लागलेले ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यावरूनही पवार यांनी भाजप आणि त्या पक्षाच्या राज्य सरकारला लक्ष्य केले. भुजबळ यांना अशी वागणूक का देण्यात आली? भुजबळ यांना जनतेपासून दूर ठेवण्याचा त्यांचा इरादा आहे. मात्र, तसे घडणार नाही. अशाप्रकारचे सूडबुद्धीचे राजकारण आम्हाला मान्य नाही. त्यामुळेच आम्ही राज्यघटना वाचवण्याची हाक दिली आहे, असे पवार म्हणाले. मोदींना पर्याय काय अशी विचारणा केली जाते. पर्याय एका रात्रीत उभा राहत नाही. सर्व समविचारी पक्षांना एकत्र करून आम्ही निवडणुकांना सामोरे जाऊ, अशी भूमिका त्यांनी मांडली.

कॉंग्रेसपुढे राष्ट्रवादी ठेवणार 50-50 सूत्र? 
आगामी निवडणुकांत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी होण्याचे निश्‍चित मानले जात आहे. राष्ट्रवादी त्या निवडणुकांसाठी कॉंग्रेसपुढे निम्म्या-निम्म्या जागा (50-50 सूत्र) लढवण्याचा प्रस्ताव मांडेल, असे संकेत पवार यांनी दिले. राज्यात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांची संख्या जवळपास सारखीच आहे. म्हणजेच आम्ही समान भागीदार आहोत, असे ते म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button