राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत धोनीचा एकट्याने सराव
बंगळुरू – अस्सल खेळाडूला आपला दर्जा मैदानावरच सिद्ध करण्याची इच्छा नसते. चाहत्यांचा गदारोळ किंवा शौकिनांचा हल्लागुल्ला यामुळे असा खेळाडू कधीच विचलित होत नसतो. माही किंवा महेंद्रसिंग धोनीने आगामी इंग्लंड दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत एकट्यानेच सराव करून हीच बाब पुन्हा एकदा सिद्ध केली.
काही वर्षांपूर्वी महत्त्वाच्या दौऱ्यापूर्वी सचिन तेंडुलकर असाच बांद्रा-कुर्ला संकुलात एकट्याने सराव करणे पसंत करीत असे. त्याचीच आठवण माहीला पाहून आज सर्वांना आली. अत्यंत कठीण अशा यो-यो चाचणीत अनेक तरुण खेळाडू अनुत्तीर्ण होत असताना कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यात असलेल्या धोनीने वयाच्या 36व्या वर्षी ही चाचणी सहजपणे पार केली.
आजही धोनी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत दाखल झाला, तेव्हा त्याच्यासोबत केवळ भारतीय संघाचा “थ्रो-डाऊन एक्स्पर्ट’ रघू आणि मुंबईचा वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूर हे दोघेच होते. पुढचे दोन तास पाहायला मिळाली, ती कसून मेहनत. रघूने 18 यार्ड अंतरावरून दिलेले थ्रो-डाऊन आणि अधूनमधून शार्दूलचा वेगवान मारा, याला धोनीने अत्यंत एकाग्रतेने तोंड दिले.
दोन तासांनंतर धोनीने थोडी विश्रांती घेतली. त्यानंतर पुन्हा सराव सुरू झाला, तेव्हा सिद्धार्थ कौलही त्यात सामील झाला होता. या सरावात धोनीने रघूचे उसळत्या आणि अंगावर येणाऱ्या थ्रो डाऊनचा सामना करण्यावर भर दिला. सुरुवातीला मैदानावर फारसे कोणी नव्हते. परंतु धोनी सराव करीत असल्याचे वृत्त पसरताच प्रेक्षकांनी, तसेच पत्रकारांनीही गर्दी केली आणि मग धोनीने सराव आवरता घेतला.