breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

राष्ट्रवादीला धक्का; प्रशांत शितोळेंची चुलत बहिण आणि भाच्याचा भाजपमध्ये प्रवेश

 पिंपरी,  – चिंचवड विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या घरातील नातेवाईकांनी भाजपला पसंती देण्यास सुरूवात केली आहे. पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष व स्थायी समितीचे माजी सभापती प्रशांत शितोळे यांची चुलत बहिण आणि भाच्याने रविवारी (दि. १४) भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे हा राष्ट्रवादीसाठी राजकीय धक्का मानला जात आहे. भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी या दोघांचेही पक्षात स्वागत केले. या पक्ष प्रवेशाच्या निमित्ताने आमदार जगताप यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीला सूचक इशाराच दिला आहे. आता ते येत्या दोन-सव्वा दोन महिन्याच्या कालावधीत राष्ट्रवादीला आणखी कोणकोणते राजकीय धक्के देतात हे पाहणे राजकीय औत्सुक्याचे ठरणार आहे.

विधानसभा निवडणुकीला अवघे दोन-सव्वा दोन महिने उरले आहेत. चिंचवड विधानसभा मतदारसंघात आमदार लक्ष्मण जगताप हे तिसऱ्यांदा ऐतिहासिक विजय मिळवण्यासाठी सज्ज आहेत. त्यांनी विधानसभा लढण्याची तयारी आताच पूर्ण करून ठेवली आहे. समाजातील सर्व घटकांची सोबत  आणि मतदारसंघात उभा केलेल्या विकासकामांचा डोंगर या आमदार जगताप यांच्या जमेच्या बाजू आहेत. त्यात आगामी निवडणुकीत भाजप-शिवसेना युती होणार असल्यामुळे आमदार जगताप यांच्या राजकीय कारकिर्दीला हत्तीचे बळ प्राप्त झालेले आहे. त्याच्या जोरावर ते चिंचवड विधानसभा मतदारसंघात राज्यातील सर्वाधिक विक्रमी मताधिक्यांनी निवडून येतील, अशी राजकीय परिस्थिती आहे.

आमदार जगताप यांच्या विरोधात चिंचवड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीकडे ताकदीचा उमेदवार नाही. राष्ट्रवादीचे जे संभाव्य उमेदवार मानले जातात, ते तोलामोलाचे नाहीत. त्यामुळे चिंचवड मतदारसंघात आमदार लक्ष्मण जगताप यांचा एकतर्फी विजय होईल, असे राजकीय जाणकारांचे स्पष्ट मत आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रवादीच्या शहर पदाधिकाऱ्यांच्या घरातील नातेवाईकही आमदार जगताप यांचे नेतृत्व मान्य करत भाजपला पसंती देऊ लागले आहेत. राष्ट्रवादीचे शहर कार्याध्यक्ष व स्थायी समितीचे माजी सभापती प्रशांत शितोळे यांची चुलत बहिण पुष्पा निंबाळकर आणि भाचा करण निंबाळकर यांनी रविवारी भाजपमध्ये प्रवेश केला.

आमदार जगताप यांच्या पिंपळेगुरव येथील जनसंपर्क कार्यालयात हा पक्ष प्रवेश सोहळा झाला. या दोघांचेही आमदार जगताप यांनी भाजपमध्ये स्वागत केले. दोघांच्याही प्रवेशामुळे सांगवी भागात भाजप आणखी मजबूत झाल्याचे मानले जात आहे. तसेच चिंचवड मतदारसंघातील राष्ट्रवादीची सद्यःस्थितीही समोर आली आहे. घरातील नातेवाइकांनीच साथ सोडण्यास सुरूवात केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस कोणाच्या बळावर विधानसभा लढवणार?, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. तसेच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार जगताप येत्या दोन-सव्वा दोन महिन्यात राष्ट्रवादीला आणखी कोणकोणते राजकीय धक्के देणार हे पाहणे राजकीय औत्सुक्याचे ठरणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button