breaking-newsमुंबई

राष्ट्रवादीच्या कोट्यातून मनसेला लोकसभेची जागा ; राज ठाकरेंचे होणार ‘कल्याण’

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला कल्याण लोकसभेची जागा सोडली जाणार असल्याच्या चर्चेने पुन्हा एकदा जोर धरला आहे. भाजपविरोधात महाआघाडीत सर्वांसाठी दारे खुली आहेत, असे वक्तव्य काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मुंबईत केल्यानंतर राष्ट्रवादीच्या कोट्यातील कल्याणची जागा मनसेला दिली जाईल अशी चर्चा सुरू झाली आहे. शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे सध्या कल्याणचे खासदार आहेत. भाजप-शिवसेनेची पुन्हा एकदा युती झाल्याने श्रीकांत शिंदे यांचे पारडे जड मानले जात आहे. मात्र, काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीने मनसेला ही जागा सोडल्यास लढत रंजक होईल असा विश्लेषकांचा अंदाज आहे.

राज ठाकरे हे सध्या भाजप पर्यायाने नरेंद्र मोदी व अमित शहांचे कडवे विरोधक आहेत. राज ठाकरे यांनी दीड- दोन वर्षीपूर्वीच मोदी- शहा या जोडीचा पराभव करण्यासाठी देशभरातील सर्व विरोधकांनी एकत्र येण्याची भूमिका मांडली होती. राज ठाकरे आजही मोदी- शहांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यामुळे साहजिकच विरोधकांत राज ठाकरे यांच्याबद्दल ‘सॉफ्ट कॉर्नर’ तयार झाला आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाली आहे तर नुकतीच भाजप- शिवसेनेचीही युती झाली आहे. मात्र, सध्या तरी सत्ताधारी भाजप-सेना युतीचे पारडे जड मानले जाते. अशा परिस्थितीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने राज्यातील समविचारी पक्षांना एकत्र घेण्याची भूमिका घेतली आहे. वंचित बहुजन विकास आघाडीसह राजू शेट्टी यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेकाप, डाव्यांसह समविचारींना एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याचसोबत भाजपविरोधक असलेल्या राज ठाकरेंच्या मनसेला महाआघाडीत सामील करून घेता येईल का याची चाचपणी राष्ट्रवादी मागील दोन- तीन महिन्यापासून करत आहे.

शरद पवारांसोबतच छगन भुजबळ, अजित पवार यांनी राज ठाकरे यांची भेट घेऊन संभाव्य आघाडीसोबत चर्चा केली होती. मनसेने ईशान्य मुंबई, कल्याण आणि नाशिक आदी जागांवर आमची ताकद असल्याचे सांगितले होते. राष्ट्रवादी मनसेला सोबत इच्छुक असली तरी उत्तर भारतीयांची मते दूर जाण्याच्या भीतीने काँग्रेसने राज ठाकरेंना सोबत घेण्यास नकार दिला होता. संजय निरूपम, अशोक चव्हाण व नंतर खुद्द शरद पवारांनीही मनसेला सामावून घेणे शक्य नसल्याचे वक्तव्य केले होते. त्यामुळे आघाडीत मनसे घेण्याबाबतचे घोंगडे भिजत पडले होते. मात्र, शनिवारी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मुंबईत येऊन भाजपविरोधी महाआघाडीत ज्यांना यायचे आहे त्यांचे दरवाजे उघडे असल्याचे वक्तव्य केले होते. हे वक्तव्य राज ठाकरे यांच्या मनसेसाठी असल्याचे जाणकरांचे म्हणणे आहे. कारण समविचारी प्रकाश आंबेडकर, राजू शेट्टींना सोबत घेण्याबाबत यापूर्वीपासूनच चर्चा सुरू आहे. त्यामुळे राहुल गांधींच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीच्या कोट्यातील कल्याण लोकसभेची जागा मनसेला सोडली जाईल अशी चर्चा रंगू लागली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button