breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

‘राम मंदिराचा निर्णय कोर्टच घेणार असेल तर भाजपाची साथ कशाला, आता शिवसेनेकडून अपेक्षा’

अयोध्येमध्ये राम मंदिराच्या उभारणीबाबत अद्यापही निर्णय न झाल्याने राम जन्मभूमी मंदिराचे मुख्य पुजारी सत्येंद्र दास यांनी सत्ताधारी भाजपावर नाराजी व्यक्त केली. राम मंदिराच्या मुद्द्यावर भाजपाने निवडणूक जिंकली आणि आता मंदिराचा मुद्दा न्यायालयात असल्याचं कारण देत मंदिर उभारणीबाबत चालढकल करत आहेत. जर राम मंदिर उभारणीचा निर्णय न्यायालयाकडूनच होणार असेल तर मग आम्ही भाजपाची साथ कशासाठी द्यायची असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आता भाजपाकडून अपेक्षा उरलेल्या नाहीत, मात्र राम मंदिराच्या आंदोलनामध्ये शिवसेनेने अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावली होती, त्यामुळे आताही केवळ त्यांच्याकडून अपेक्षा आहेत असं सत्येंद्र दास म्हणाले.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत सत्येंद्र दास यांनी हे विधान केल्याने त्यांच्या विधानाला वेगळं महत्त्व प्राप्त झालं आहे. कारण, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे लवकरच अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांच्या या दौऱ्याआधी अयोध्येतील तयारीची पाहणी करण्यासाठी संजय राऊत यांनी शुक्रवारी अयोध्येला भेट दिली. यावेळी त्यांनी सत्येंद्र दास यांची भेट घेतली. जर भाजपाने रामलल्लांना वनवासात ठेवलं, तर जनता 2019 मध्ये भाजपाला वनवासात पाठवेल अशी बोचरी टीका यावेळी बोलताना राऊत यांनी भाजपावर केली. ‘तीन तलाक आणि एससी/एसटीच्या मुद्द्यावर मोदी सरकारने अध्यादेश काढले आहेत तर आता राम मंदिर निर्माणासाठी अध्यादेश का काढत नाही?’ असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

उद्धव ठाकरे हे दसऱ्यानंतर अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यासंदर्भात दसरामेळाव्यात उद्धव ठाकरे बोलणार असल्याची माहिती आहे. उद्धव ठाकरे या दौऱ्यादरम्यान अयोध्येत सभा घेणार का? ते काय बोलणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राम मंदिराच्या मुद्द्यावरुन शिवसेनेने भाजपाला कोंडीत पकडण्याची एकही संधी सोडलेली नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button