breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘राममंदिर निर्माण कायद्या’च्या समर्थनार्थ “व्हीएचपी”वर ओढवली निमुष्की

  • भाजप खासदारांच्या समर्थनाबाबत मनात साशंकता
  • राज्यसभा खासदार अमर साबळे यांना दिले निवेदन

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपची सत्ता असताना राम मंदिर उभारण्यासाठी कायदे तयार करण्याची मागणी दृढ झाली आहे. कायद्याला समर्थन मिळविण्यासाठी स्वःपक्षाच्या खासदारांना याचना करण्याची वेळ विश्व हिंदु परिषदेवर (व्हीएचपी) आली आहे. समर्थनासाठीचे निवेदन राज्यसभा खासदार अमर साबळे यांना देण्यात आले आहे. तथापि, भाजपची पाळेमुळे मजबूत करण्यात महत्वाची भूमिका निभावणा-या “व्हीएचपी”वर अशी वेळ यावी, हे खेदाचे मानले जात आहे.

खासदार साबळे यांच्या निगडी प्राधिकरणातील निवासस्थानी निवेदन देण्यात आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत कार्यकारिणी सदस्य विनायक थोरात, संघाचे विभाग कार्यवाह मुकुंद कुलकर्णी, संघाचे प्रांत विशेष संपर्क प्रमुख मिलिंद देशपांडे, विहिंपचे प्रांत मंत्री विजय देशपांडे, विहिंपचे प्रांत सेवा कार्य प्रमुख दादा ढवाण, विहिंपचे शहराध्यक्ष शरद इनामदार, शहर मंत्री नितीन वाटकर, बजरंग दलाचे प्रांतपालक अशोकराव येलमार, शहर संयोजक नाना सावंत, वनवासी कल्याण आश्रमचे नरेंद्र पेंडसे, पुरुषोत्तम अनंतपुरे, दुर्गा वाहिनीचे प्रांतपालक पांडुरंग फाटक, सहकार भारतीचे जिल्हा सचिव औदुंबर नाईक भाजपाचे शहर प्रवक्ता अमोल थोरात, महापालिकेतील सत्तारुढ पक्षनेता एकनाथ पवार आदी यावेळी उपस्थित होते.

खासदार साबळे यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, हिंदू समाज 1528 पासून भव्य राममंदिर उभारण्यासाठी संघर्ष करीत आहे. या मुद्यावर सातत्याने चर्चा होऊनही यश आलेले नाही. न्यायपालिकेच्या माध्यमातून या मुद्यावर समाधान व्हावे, म्हणून 1950 पासून त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, न्यायालयात निकाल लागण्याचा कालावधी अनिश्चित आहे. श्रीराम जन्मभूमीवर राम मंदिर उभारण्याचा 1528 पासूनच हिंदू समाजाचा दृढ संकल्प आहे. अनावश्यक आणि अनाकलनीय विलंब हिंदू समाजाच्या धैर्याची परीक्षा घेत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने कायदा बनवून श्रीराम जन्मभूमीवर राम मंदिर निर्माणाचा मार्ग प्रशस्त करावा, हेच याचे एकमात्र समाधान होऊ शकते. राज्यसभेचे खासदार म्हणून आपण रामभक्त आणि संत समाजाच्या तीव्र भावना सरकारपर्यंत पोहचवाव्यात आणि श्रीराम जन्मभूमीवर राम मंदिर निर्माणाच्या कायद्याचे समर्थन करावे, अशी विनंती या निवेदनातून करण्यात आली आहे.

“व्हीएचपी”वर याचना करण्याची वेळ

गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपची सत्ता आणण्यात “आरएसएस”ची महत्वाची भूमिका मानली जाते. त्यात “व्हीएचपीचा”ही तेवढाच वाटा आहे. सरकारने कोणता निर्णय घ्यावे, हे नागपूर येथील “आरएसएस”च्या केंद्रातून ठरते. तत्पुर्वी, “व्हीएचपी”ला विचारात घेतल्याशिवाय “आरएसएस”ही पुढे जात नाही. असे असताना भाजपचे राज्यसभा खासदार असलेले अमर साबळे यांच्या समर्थनासाठी याचना करण्याची वेळ “व्हीएचपी”वर आली असल्याने भाजप खासदारांकडून देखील राम मंदिराला विरोध होऊ शकतो, अशी भीता त्यांना वाटू लागली असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. म्हणूनच, त्यांनी पक्षाच्या राज्यसभा खासदारांना याचना करण्याचा मार्ग धरल्याचे दिसते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button