breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

राणीबागेत पांढऱ्या सिंहाची गर्जना

प्राणिसंग्रहालयाचा सुधारित आराखडा केंद्रीय प्राधिकरणाकडे

भायखळ्याच्या ‘वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय’ अर्थात राणीबाग परिसरालगतच्या मफतलालच्या जागेवरील भूखंडांचा तिढा सुटल्याने आता या जागेचाही प्राणिसंग्रहालयात समावेश करण्यात येणार आहे. याचा विस्तारित सुधारित आराखडा नुकताच केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. या आराखडय़ानुसार विस्तारित जागेवर दक्षिण आफ्रिकेतील पांढऱ्या सिंहाची गर्जना ऐकू येणार आहे. पांढरा सिंह भारतात अन्यत्र कुठेच नाही. त्यामुळे पेंग्विननंतर भारतातील हा दुसरा परदेशी पाहुणा ठरणार आहे.

राणीबाग नूतनीकरणाचे आणि सुशोभीकरणाचे काम सध्या सुरू आहे. मागील दोन वर्षांत राणीबागेचा चांगलाच कायापालट झाला आहे. पेंग्विन पक्ष्यामुळे राणीबागेतील गर्दी वाढत आहे. विविध देशांमधून परदेशी प्राणी आणि पक्षी या ठिकाणी आले की राणीबागेला तिचे गतवैभव परत मिळेल. या प्राणी-पक्ष्यांकरिता पिंजऱ्यांची कामे सुरू आहेत. त्यात राणीबागेशेजारील मफतलाल मिलची जागाही आता पूर्णपणे महापालिकेच्या ताब्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयातही महापालिकेच्या बाजूने निकाल लागल्याने या जागेत करण्यात येणाऱ्या विस्तारित प्राणिसंग्रहालयाचा आराखडा मान्यतेसाठी केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाकडे नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवडय़ात पाठवण्यात आला आहे.

मफतलालच्या २७ हजार २८४.३६ चौरस मीटर एवढय़ा आकाराचा भूभागावर प्राण्यांचे नंदनवन फुलणार असून त्या ठिकाणी १५ प्राण्यांच्या पिंजऱ्यांचे बांधकाम करण्यात येणार आहे. या विस्तारित प्राणिसंग्रहालयाचा आराखडा मंजुरीसाठी अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जऱ्हाड यांनी नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवडय़ात केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाकडे पाठवण्यात आला आहे. राणीबाग प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाटी यांनी या माहितीला दुजोरा दिला. यापूर्वी सादर केलेल्या आराखडय़ात केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने काही दुरुस्ती सुचविल्या होत्या. त्यानुसार बदल करून हा सुधारित आराखडा सादर करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

विस्तारित प्राणिसंग्रहालयात पांढऱ्या सिंहाबरोबरच चिम्पांझी, झेब्रा, जिराफ, जग्वार, ऑस्ट्रीच, कांगारू, चिता, गेंडा आदी प्राणी आणले जाणार आहे. प्राधिकरणाच्या मंजुरीनंतर दोन ते अडीच वर्षांमध्ये यातील पिंजऱ्यांची कामे पूर्ण होऊन प्राण्यांचे आगमन होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दक्षिण आफ्रिकेतील पांढरा सिंह हा भारतातील कोणत्या प्राणिसंग्रहालयात नाही. तो आल्यास देशातील पहिला पांढरा सिंह ठरणार आहे आणि तो मान राणीबागेला मिळत आहे, असे त्यांनी सांगितले. मात्र त्याकरिता किमान दोन वर्षे प्रतीक्षा करावी लागेल.

विस्तारित प्राणिसंग्रहालयात येणारे प्राणी

* आफ्रिका – चिम्पांझी, जिराफ, झेब्रा, चित्ता, गेंडा, लमूर, शहामृग

* ऑस्ट्रेलिया – कांगारू, वालाबी, इमू आणि काळा हंस

* दक्षिण आफ्रिका – पांढरा सिंह, ’ दक्षिण अमेरिका – जग्वार

* आग्नेय आशिया – टापीर, होलॉक, गीब्बान

* प्रायमेट बेट – बॉनेट मॅकक व फ्लेमिंगो

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button