breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

राज्याच्या सर्वांगिण विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प : बाळासाहेब थोरात

मुंबई| महाईन्यूज| प्रतिनिधी
महाविकास आघाडी सरकारने आज सादर केलेला अर्थसंकल्प हा समाजातील सर्व घटकांना न्याय देणारा तसेच राज्याच्या सर्वांगिण विकासाला चालना देणारा आहे. कृषी विभाग, महिलावर्ग, रोजगार निर्मितीसाठी या अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आलेली आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री यांनी दिली आहे.
अर्थसंकल्पाचे स्वागत करून बाळासाहेब थोरात पुढे म्हणाले की, या अर्थसंकल्पात शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला, तरूण, विद्यार्थी, दलित, आदिवासी अल्पसंख्यांक अशा सर्व समाज घटकांना न्याय देणारा तसेच विकासाच्या बाबतीत महाराष्ट्राला गतवैभव प्राप्त करुन देणारा आहे. महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी २२ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली असून आजपर्यंत जवळपास १३ लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात आली आहे. दोन लाख रुपयांपेक्षा जास्त कर्ज असलेल्या शेतकऱ्यांसाठीही ओटीस योजना आणण्यात येणार असून नियमीत कर्जफेड करणा-या शेतक-यांनाही पन्नास हजार रूपयांचा लाभ देण्यात येणार आहे. राज्यातील जलसंपदा विभागासाठी १० हजार ३५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. तसेच दरवर्षी एक लाख कृषीपंप जोडणी देण्याची योजना असून पाच वर्षात पाच लाख सौरपंप जोडणी दिली जाईल. तसेच कृषीपंपासाठी दिवसा वीज देण्याचा सरकारचा मानस आहे, याचा शेतक-यांना मोठा फायदा होणार आहे.
गेल्या पाच वर्षात राज्याची आर्थिक घडी विस्कटली असतानाही या अर्थसंकल्पात विकास कामासाठी निधीची कमतरता पडणार नाही याची काळजी घेण्यात आलेली आहे. राज्यात औद्योगिक गुंतवणूक वाढवून रोजगार निर्मीतीवरही भर देण्यात येणार आहे. त्यासाठी औद्योगीक वापरावरील वीज शुल्कात कपात करण्यात येणार आहे. स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी कायदा केला जाणार आहे.
या अर्थसंकल्पात जनतेला चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजनेची व्याप्ती वाढवण्यात आली असून राज्यात ७५ नवी डायलिसीस सेंटर सुरु करण्यात येणार आहेत. राज्यभरात दररोज १ लाख शिवभोजन थाळी देण्यात येणार असून मुंबईत मराठी भाषा भवनही उभारले जाणार आहे.
महिला सक्षमिकरणाचा भाग म्हणून प्रत्येक जिल्ह्यात एक विशेष पोलीस स्टेशन निर्माण केले जाईल ज्यात अधिकारी व कर्मचारी सर्वच महिला असतील. तसेच महिला आयोगाचे कार्यालय प्रत्येक विभागीय पातळीवर असेल याची तरतूद करण्यात आलेली आहे. महाविकास आघाडी सरकारने सर्वसामान्य जनतेला डोळ्यासमोर ठेवून अर्थसंकल्पात योग्य त्या तरतूदी केल्या आल्या आहेत. राज्याचा विकासाचा रूतलेला गाडा पुन्हा प्रगतीपथावर आणण्यासाठी या अर्थसंकल्पातून चालना मिळेल असेही थोरात म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button