breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

रयत विद्यार्थी विचार मंचच्या वतीने भारतरत्न अबुल कलाम आझाद यांची जयंती साजरी

पिंपरी / महाईन्यूज

भारतरत्न अबुल कलाम आझाद यांची जयंतीनिमित्त रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेच्या संपर्क कार्यालय त्यांना अभिवादन करण्यात आले. संस्थापक अध्यक्ष धम्मराज साळवे यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी महासचिव संतोष शिंदे, सदस्य इसाक पठाण उपस्थित होते.

भारतरत्न अबुल कलाम आझाद एक भारतीय प्रमुख राजकीय पुढारी होते. त्यांचे मूळ नाव मोहिउद्दीन अहमद असे असून अबुलकलाम म्हणजे वाचस्पती ही त्यांची पदवी होती. पुढे ‘आझाद’ (स्वतंत्र) हे टोपणनावही त्यांना ही उपाधी मिळाली. त्यांचा जन्म मक्केला झाला. वडिलांबरोबर १८९० साली ते कलकत्याला आले. पारंपरिक मुसलमानी शिक्षणपद्धतीप्रमाणे मौ. आझादांनी फार्सी, उर्दू व अरबी या भाषांचे प्रथम अध्ययन करून नंतर तर्कशास्त्र, इस्लाम धर्म, तत्त्वज्ञान व गणित ह्यांचा अभ्यास केला. पुढे सर सय्यद अहमदखान ह्यांच्या लेखांचा परिणाम होऊन मौलानांनी इंग्रजीचा अभ्यास स्वतंत्रपणे सुरू केला.१९०८ मध्ये ईजिप्त, अरबस्तान, तुर्कस्तान, फ्रान्स इ. देशांना त्यांनी भेटी दिल्या.

तेथील क्रांतिकारकांच्या संपर्कामुळे त्यांची राजकीय मते बदलू लागली आणि कलकत्त्यास परत येताच हिंदी मुसलमानांनी स्वातंत्र्यसंग्रामात पुढाकार घ्यावा, हे मत त्यांनी प्रतिपादिले. लोकजागृतीसाठी १९१२ साली कलकत्ता येथे त्यांनी अल्-हिलाल हे उर्दू साप्ताहिक सुरू केले. अनेक वृत्तपत्रांतून ‘आझाद’ ह्या टोपणनावाने ते लेखन करीत. अल्-हिलालमधील प्रखर राजकीय टीकेमुळे ब्रिटिश सरकारने त्यांच्याकडून १०,००० रुपयांचा जामीन मागितला. आझादांनी तो दिला नाही, म्हणून ते वृत्तपत्र बंद पडले. १९१५ साली त्यांनी अल्-बलाघ हे दुसरे वृत्तपत्र काढले.

त्यामुळे आझादांना अनेक प्रांतांत जाण्यास बंदी घालण्यात आली; पुढे त्यांना सांचीला स्थानबद्ध करण्यात आले. मुसलमानांत त्यांच्या अटकेमुळे नवे वारे संचारले. १९२० साली त्यांची सुटका झाली. ते असहकाराच्या चळवळीत सामील झाले. १९२१ मध्ये पुन्हा त्यांना अटक करण्यात आली; पण एका वर्षानंतर त्यांना मुक्त करण्यात आले; १९२३ च्या दिल्ली येथील कॉंग्रेसच्या विशेष अधिवेशनाचे ते अध्यक्ष झाले. १९३० मध्ये त्यांना पुन्हा कैद झाली. ह्या वेळी मुसलमान जमातीस सत्याग्रहात सामील करून घेण्याचे मुख्य श्रेय आझादांनाच मिळाले.

आझाद १९३९ ते ४६ पर्यंत कॉंग्रेसचे अध्यक्ष होते. १९४२ च्या चले जाव आंदोलनाच्या वेळी त्यांना पुन्हा तुरुंगवास भोगावा लागला. १९४५ साली सर्व नेत्यांबरोबर त्यांची सुटका झाली. १९४२ ची क्रिप्सयोजना, १९४५ ची वेव्हेलची सिमला परिषद व १९४६ मधील ब्रिटिश मंत्र्यांचे शिष्टमंडळ इ. प्रसंगीच्या सर्व वाटाघाटींत कॉंग्रेसतर्फे अध्यक्ष ह्या नात्याने त्यांनीच पुढाकार घेतला. स्वातंत्र्यानंतर ते केंद्रीय मंत्रिमंडळात सामील झाले आणि अखेरपर्येत शिक्षणमंत्री म्हणून राहिले, अशी माहिती अध्यक्ष धम्मराज साळवे यांनी दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button