breaking-newsक्रिडा

युवा नेमबाजांची कमाल!

  • आशियाई नेमबाजी स्पर्धा

अंगद वीर सिंह बाजवा आणि मायराज अहमद खान यांनी स्किट प्रकारात तर ऐश्वर्य प्रताप सिंह तोमर या युवा नेमबाजांनी केलेल्या अप्रतिम कामगिरीमुळे भारताने टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत तब्बल १५ जागा निश्चित केल्या. दोहा येथे सुरू असलेल्या १४व्या आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत रविवारी अंगद आणि मायराज यांनी स्किट प्रकारात अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्यपदकाची कमाई केली. ऐश्वर्य याने पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात कांस्यपदक मिळवले.

भारताच्या तीन जणांनी रविवारी ऑलिम्पिकमध्ये स्थान निश्चित केल्यामुळे टोक्यो ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत भारताचा आतापर्यंतचा सर्वात मोठा संघ सहभागी होईल. याआधी २०१२ लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताच्या ११ तर २०१६च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये १२ नेमबाजांनी प्रतिनिधित्व केले होते.

२३ वर्षीय बाजवा आणि ४४ वर्षीय मायराज यांनी अंतिम फेरीत प्रत्येकी ५६ गुणांची कमाई करत अव्वल स्थान पटकावले. त्यानंतर झालेल्या ‘शूट-ऑफ’मध्ये अंगद सरस ठरला. कुवेतच्या हबिब सौद याला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

मनू भाकर आणि अभिषेक वर्मा यांनी भारताच्याच सौरभ चौधरी आणि यशस्विनी सिंह देस्वाल यांचा १६-१० असा पाडाव करत १० मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात सुवर्णपदकावर नाव कोरले. त्याचबरोबर, कनिष्ठ एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात, ईशा सिंह आणि सरबज्योत सिंह यांनी कोरियाच्या मिनसेओ किम आणि युनहो संग यांच्यावर १६-१० अशी मात करत सुवर्णपदक पटकावले.

मध्य प्रदेशच्या खारगोन जिल्ह्य़ातील रतनपूर गावात राहणाऱ्या १८ वर्षीय ऐश्वर्य याने आठ जणांच्या अंतिम फेरीत ४४९.१ गुणांची कमाई करत तिसरे स्थान पटकावले. कोरियाच्या किम जोंगह्य़ून याने ४५९.९ गुणांसह सुवर्ण तर चीनच्या झोंगघाओ झाओ याने ४५९.१ गुणांसह रौप्यपदकावर नाव कोरले. ऐश्वर्य याने पात्रता फेरीत ११६८ गुणांची कमाई केली होती.

अंतिम फेरीत चीनचा जागतिक क्रमवारीतील तिसऱ्या क्रमांकाचा तसेच कोरियाचा नवव्या क्रमांकाचा आणि कझाकस्तानचा अनुभवी युरी युरकोव्ह आणि इराणचा महयार सेदाघाट हे अव्वल नेमबाज असतानाही ऐश्वर्य याने छाप पाडली. गुडघ्यावर बसून वेध घेताना त्याने १५ प्रयत्नांत १५१.७ गुण मिळवले होते. त्यानंतर प्रोन विभागात त्याने १५६.३ गुण मिळवले. ऐश्वर्य याने चेन सिंग (११५५) आणि पारूल कुमार (११५४) यांच्यासह भारताला सांघिक कांस्यपदकही मिळवून दिले. वैयक्तिक प्रकारात चेन सिंगला १७व्या तर पारूल कुमारला २०व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

ऐश्वर्य याने कनिष्ठ विश्वचषक स्पर्धेत रायफल थ्री पोझिशन प्रकारात विश्वविक्रमाची नोंद केली होती. रायफल थ्री पोझिशन प्रकारात ऑलिम्पिकचे स्थान मिळवणारा ऐश्वर्य हा संजीव राजपूत याच्यानंतरचा भारताचा दुसरा नेमबाज ठरला आहे. सूमा शिरूर यांच्या मार्गदर्शनाखाली ऐश्वर्य सध्या सराव करत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button