breaking-newsराष्ट्रिय

मोदी, शहांकडून ममता लक्ष्य हा कटाचाच भाग- मायावती

लखनऊ : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या बचावासाठी बसपाच्या नेत्या मायावती पुढे सरसावल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी कट रचला असून त्याचाच एक भाग म्हणून ममता यांना लक्ष्य केले जात आहे आणि यावरून धोकादायक वृत्ती प्रतिबिंबित होत आहे, असा आरोप मायावती यांनी केला आहे.

पश्चिम बंगालमधील निवडणूक प्रचाराच्या मुदतीमध्ये कपात करण्यात आल्यानंतर मायावती यांनी, निवडणूक आयोग केंद्र सरकारच्या दबावाखाली काम करीत असल्याचा, आरोप केला. दर दिवशी आपल्याला पश्चिम बंगालमधून नवी बातमी मिळत आहे आणि त्याला भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जबाबदार आहे, असा आरोप मायावती यांनी येथे एका पत्रकार परिषदेत केला.

पश्चिम बंगालमधील निवडणुकीशी संबंधित हिंसाचाराचा विचार करता स्पष्टपणे दिसत आहे की, भाजप, मोदी आणि त्यांचा शिष्य शहा यांनी कट रचला असून ते ममता बॅनर्जी सरकारला लक्ष्य करीत आहेत, असे मायावती म्हणाल्या. मोदी सरकारच्या अपयशापासून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी हे प्रकार सुरू आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

गुरू आणि शिष्य ज्या पद्धतीने ममता सरकारला लक्ष्य करीत आहेत ती धोकादायक वृत्ती असल्याचे दर्शविते, अशी वृत्ती केवळ चुकीचीच नाही तर ती असमर्थनीय आहे, असेही मायावती म्हणाल्या. ममता आणि त्यांच्या सरकारची बदनामी करण्याचा प्रकार पंतप्रधानांना शोभत नाही, असेही त्या म्हणाल्या.

मोदी खोटे बोलतात, त्यांनी उठाबशा काढाव्यात – ममता

मथुरापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी इतके खोटे बोलतात की त्यांनी त्याबद्दल उठाबशा काढल्या पाहिजेत, अशी टीका ममता बॅनर्जी यांनी केली. इतकेच नव्हे तर मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांना तुरुंगात पाठविण्याची धमकीही त्यांनी दिली आहे. ईश्वरचंद्र विद्यासागर यांचा पुतळा बसविणार असल्याचे मोदी सांगतात, मात्र बंगालकडे पुतळा तयार करण्यासाठी पैसे आहेत, परंतु २०० वर्षांचा वारसा ते परत आणू शकतात का, असा सवालही बॅनर्जी यांनी केला आहे. विद्यासागर यांचा पुतळा तुम्ही तोडल्याचा आमच्याकडे पुरावा आहे आणि तुम्ही आमच्यावरच आरोप करीत आहात, इतके तुम्ही खोटे बोलता त्याबद्दल उठाबशा काढल्या पाहिजेत, आरोप सिद्ध करा अन्यथा तुम्हाला तुरुंगामध्ये पाठविले जाईल, अशी धमकीही ममता बॅनर्जी यांनी दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button