breaking-newsराष्ट्रिय

मोदींच्या काळातच देशाचे थकित कर्ज 12 लाख कोटींवर : राहुल गांधी

युपीएच्या काळात थकित कर्जाचे प्रमाण केवळ 2 लाख कोटी

जयपुर: बॅंकांमध्ये वाढलेले थकित कर्ज ही कॉंग्रेसचीच देन असल्याचे वक्तव्य काल भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी केले होते. पण त्याचा आज कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी उदयपुर येथील प्रचार सभेत जोरदार समाचार घेतला. ते म्हणाले की युपीएच्या काळात केवळ बॅंकांचे थकित कर्ज 2 लाख कोटी रूपये इतके होते तेच कर्ज गेल्या चार वर्षांच्या काळात तब्बल 12 लाख कोटींवर गेले आहे.

मोदी सरकारने केवळ 15 ते 20 उद्योगपतींचे अब्जावधी रूपयांचे कर्ज माफ केले आहे. देशाची बॅंकिंग सिस्टीम मोदींनी केवळ श्रीमंत उद्योगपतींसाठीच राबवली. छोट्या, लघु किंवा मध्यम उद्योगांची कर्जे कधीच माफ केली गेली नाहीत. छोटे व्यावसायिक, व्यापारी, डॉक्‍टर्स, वकिल, विक्रेते यांना कधीच मोदींच्या कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही असे ते म्हणाले.

पाकिस्तानवर लष्कराने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा भाजपकडून सातत्याने राजकीय लाभासाठी वापर करून घेतला जात असल्याचा आरोप करून ते म्हणाले की मनमोहनसिंग यांच्या काळातही पाकिस्तानवर तीन वेळा सर्जिकल स्ट्राईक केले गेले होते पण लोकांना त्याची कल्पना आहे का? आम्ही त्याचे कधीही राजकीय भांडवल केले नाही पण मोदींनी केवळ एक सर्जिकल स्ट्राईक केला. गेली दोन वर्षे त्याचे राजकीय भांडवल त्यांनी चालवले आहे. लष्कराने केलेल्या कामगीरीचा राजकीय लाभ उठवण्याचा हा प्रकार लाजीरवाणा आहे असे ते म्हणाले. सर्जिकल स्ट्राईक सारखा प्रकार जाहीरही करायचा नसतो पण भाजपने उत्तरप्रदेशच्या निवडणुकीच्या काळात तो जाहीर करून त्याचा राजकीय लाभ उठवला.

मोदी सरकारने केलेली नोटबंदी हा मोठा भ्रष्टाचार होता असे नमूद करून ते म्हणाले की त्यांनी आणलेल्या चुकीच्या जीएसटीमुळे देशाची अर्थव्यवस्था मोडकळीला आली. सामान्य माणसांचे कंबरडे त्यामुळे मोडले गेले आहे. केंद्रातील भाजप सरकारने देशात रोजगार संधी निर्माण न केल्याने देशातील युवक आज निराश आहे. देशातील सार्वजनिक आरोग्य आणि शिक्षणासाठी हे सरकार पुरेसा पैसा देत नाही त्यामुळे लोकांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. देशात मोठ्याप्रमाणावर आरोग्य सुविधा आणि दवाखाने उघडल्याशिवाय लोकांच्या समस्या सुटणार नाहीत. नुसत्या आयुष्यमान भारत योजनेचा गाजावाजा करून उपयोग नाही त्यासाठी चांगले दवाखाने, रूग्णालये देशात उभारावी लागतील असे ते म्हणाले. देशाला पुढील 15 ते 20 वर्ष चांगले सरकार मिळाले तर भारत चीनलाही मागे टाकू शकेल असे ते म्हणाले. आज चीनकडे आघाडी आहे पण अजून आपण स्पर्धेतून बाद झालेले नाही त्यासाठी देशात आता उत्तम सरकार आले पाहिजे असे ते म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button