breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

‘मेट्रो ३’च्या भुयारीकरणाचा तेरावा टप्पा पूर्ण

५२ पैकी २६.१५ किलोमीटरचे भुयार तयार

मुंबई : कुलाबा ते सीप्झ या ‘मेट्रो ३’ भुयारी मार्गिकेवरील भुयारीकरणाच्या तेराव्या टप्प्याचे काम शुक्रवारी सकाळी पूर्ण झाले. विधानभवन मेट्रो स्टेशनजवळ ‘सूर्या २’ हे टनेल बोअिरग मशीन (टीबीएम) सकाळी साडेनऊच्या सुमारास भुयारातून बाहेर आले. या यंत्राद्वारे कफ परेड ते विधानभवन स्थानक या १.२४ किलोमीटर अंतराचे भुयारीकरण पूर्ण झाले आहे.

कफ परेड स्थानकापासून या भुयारी टप्प्याची सुरुवात झाली आहे. याचे भुयारीकरण सुरू करण्यापूर्वी व प्रत्यक्ष सुरू झाल्यानंतरही अनेक वादांना ‘मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड’ला (एमएमआरसी) तोंड द्यावे लागले होते. अनेक न्यायालयीन लढय़ांनंतर कुठे या मार्गातील अडसर दूर होऊन साधारणपणे २०० दिवसांत हा टप्पा पूर्ण करण्यात ‘एमएमआरसी’ला यश आले आहे.

कफ परेड येथे खोदलेल्या विवरात ६०० मेट्रिक टन वजनाचे ‘सूर्या २’ हे टीबीएम उतरवण्यात आले होते. त्याची लांबी ९५ मीटर इतकी आहे. प्रत्येक दिवशी सात रिंग्ज या वेगाने भुयारीकरणाचे काम या यंत्राद्वारे केले गेले. २०५ दिवसांनंतर हे भुयार शुक्रवारी सकाळी पूर्ण झाले. भुयारीकरणाच्या तेराव्या टप्प्यासाठी एकूण ८३८ रिंग्सचा वापर करण्यात आला आहे. या भुयाराच्या कामामुळे ‘पॅकेज १’ मधील ५.८९ किलोमीटरपैकी २.४८ इतके भुयारीकरण पूर्ण झाल्याचे ‘एमएमआरसी’च्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

संपूर्णपणे जमिनीखालून जाणाऱ्या मेट्रो ३ मार्गिकेवर एकूण २७ थांबे असतील. संपूर्ण मार्गिकेवरील एकूण ५२ किलोमीटर भुयारीकरणापैकी २६.१५ किलोमीटरचे भुयारीकरण पूर्ण झाल्याचे मेट्रो ३च्या अधिकाऱ्यांनी सांगितले. भुयारीकरणासाठी सध्या १७ टीबीएम यंत्रे कार्यरत आहेत. ‘टीबीएम’ यंत्रे उतरवण्यासाठी मार्गिकेवरील सात ठिकाणी मोठी विवरे (लाँचिंग शाफ्ट) खोदण्यात आली आहेत.

चर्चगेट स्टेशनबाहेर नियंत्रित स्फोट

चर्चगेट स्टेशनबाहेर मेट्रोचे काम सुरू आहे, त्या ठिकाणी शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास छोटासा स्फोट करण्यात आला. त्या वेळी सर्व वाहने, पादचाऱ्यांना थांबवण्यात आले होते. ‘‘खोदकाम करताना लागलेला कठीण खडक यंत्राद्वारे फोडणे कधी कधी कठीण जाते. अशा वेळी लहान स्वरूपाचा नियंत्रित स्फोट केला जातो. सुरक्षा उपाय म्हणून अशा वेळी पाचेक मिनिटांसाठी वाहतूक, पादचारी यांना थांबवले जाते,’’ असे मेट्रो ३च्या अधिकाऱ्यांनी सांगितले. हा नियंत्रित स्फोट मेट्रो ३ च्या चर्चगेट स्थानकाच्या कामासाठी करण्यात आला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button