breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

आरक्षणबाधित विद्यार्थी-पालकांचे सरकारच्या अध्यादेशाविरोधात आंदोलन

मराठा विद्यार्थ्यांना आरक्षण देण्यासाठी सरकारचा डावपेच; पालकांचा आरोप

मुंबई : वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेश प्रक्रियेत मराठा आरक्षण कायद्यानुसार १६ टक्के आरक्षण लागू करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय डावलून अध्यादेश काढणाऱ्या सरकारच्या डावपेचाच्या राजकारणाविरोधात आरक्षणामुळे बाधित होणाऱ्या विद्यार्थी-पालकांनी (खुल्या वर्गातील) शनिवारी कार्टर रोड येथे आंदोलन पुकारले आहे. राजकारणी लोकांचा पाठिंबा असलेल्या मराठा आंदोलक विद्यार्थ्यांना कुरवाळत सामान्य नागरिकांना मात्र सावत्रपणाची वागणूक सरकार देत असल्याचा आरोप या पालकांनी केला आहे.

प्रवेश प्रक्रियेचा तिढा सोडविण्यासाठी राज्य सरकारने शुक्रवारी अध्यादेश जाहीर करत मराठा समाजाच्या मुलांना संरक्षण दिले आहे. हा निणर्य गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांवर अन्याय करणारा असल्याचा आरोप करत पालकांनी शुक्रवारी आझाद मैदान येथे आंदोलन करण्याची तयारी केली होती. आझाद मैदान येथे सध्या मराठा विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू असल्याने सुव्यवस्था राखण्याचे कारण देत तूर्तास तेथे आंदोलन करण्याची परवानगी आझाद मैदान पोलीस ठाण्याने गुरुवारी नाकारली. या विद्यार्थ्यांचे आंदोलन संपल्यानंतर तुम्ही आंदोलन करावे, असेही पोलिसांनी सुचविले आहे. परंतु या प्रश्नाबाबत अंतिम तोडगा निघेपर्यत आंदोलन स्थगित करणार नाही, या भूमिकेवर मराठा आंदोलनकर्ते विद्यार्थी ठाम असल्याने आमचे आंदोलन दडपण्यासाठी हा डाव केल्याचा आरोप आरक्षणबाधित विद्यार्थ्यांनी केला आहे. आंदोलनासाठी एकवटेल्या विद्यार्थी पालकांनी परवानगी नाकारल्याचे लिहून घेऊन पोलीस आयुक्तांकडे धाव घेतली. आयुक्तांकडील चर्चेनंतर कार्टर रोड येथील अ‍ॅम्पी थिएटरजवळ आंदोलन करण्याची परवनागी पोलिसांनी दिली आहे. शनिवारी सकाळी दहा वाजल्यापासून विद्यार्थी व  पालक जमा होतील आणि राज्य सरकारच्या दडपशाहीविरोधात आवाज उठवतील, असे पालक प्रतिनिधी व वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेच्या अभ्यासक सुधा शेणॉय यांनी सांगितले.

आम्ही मागील चार महिन्यांपासून मंत्रालयाच्या पायऱ्या झिजवत आहोत. मात्र आमच्याकडे लक्ष देणे सरकारला फारसे महत्त्वाचे वाटत नाही. यातून पुन्हा सरकारचे दुटप्पी धोरण सिद्ध झाल्याचा आरोप शेणॉय यांनी केला.

मराठा आंदोलनकर्ते विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू होण्यापूर्वीपासून आम्ही आंदोलनासाठी परवानगी मागत आहोत. मात्र दरवेळेस ती नाकारली गेली. मराठा आंदोलक विद्यार्थ्यांमागे राजकीय हितसंबंध असल्याने त्यांना उजवे स्थान दिले जाते.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button