breaking-newsराष्ट्रिय

मेट्रो डब्यांच्या निर्मिती तंत्रज्ञानासाठी १५० कोटींची निविदा

२०२१ पर्यंत पहिला डबा तयार होणार

मेक इन इंडिया प्रकल्पात रेल्वेची निर्मिती करण्यासाठी दी मॉडर्न कोच फॅक्टरीने (आधुनिक डबे कारखाना) तंत्रज्ञान विकत घेण्यासाठी १५० कोटी रुपयांची निविदा जारी केली आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे मेट्रो गाडय़ांचे डबे २०२१ पर्यंत तेथे निर्माण केले जाणार आहेत. गेल्या आठवडय़ात रायबरेली येथील एमसीएफ कारखान्याने ही निविदा जारी केली आहे.

मेट्रो व रेल्वेचे डबे तयार करणाऱ्या बाजारपेठेत आम्ही उतरत आहोत, त्यात सुरुवातीला देशातील गाडय़ांसाठीच हे डबे तयार केले जाणार आहेत. सध्या हे डबे मोठय़ा प्रमाणात आयात करावे लागत आहेत. ते या कारखान्यात कमी किमतीत तयार केले जाणार आहेत. २८ फेब्रुवारीला निविदा उघडण्यात येणार असून, २०२१ पर्यंत अशा प्रकारचा पहिला डबा तयार केला जाणार आहे.

कोलकाता मेट्रोचे डबे सध्या चेन्नई येथील ‘इंटिग्रल कोच फॅक्टरी’ (आयसीएफ) येथे तयार केले जात असून, एमसीएफ या रायबरेलीतील कारखान्यात आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान वापरलेले डबे प्रथमच तयार केले जाणार आहेत. ते जास्त चांगल्या दर्जाचे असतील.  रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, की सध्या इतर देशातून जे डबे आयात केले जातात त्यासाठी ८ ते ९ कोटी रुपये खर्च येतो. आमच्याकडे मोठय़ा प्रमाणात मागणी नोंदवली गेल्यास ते ४ ते ६ कोटींना उपलब्ध करून दिले जातील.

सध्या मेट्रोचे एकूण २२ प्रकल्प सुरू असून त्यात दिल्ली, बंगळुरू, लखनौ, चेन्नई, नागपूर, पुणे, कोची, अहमदाबाद, नोईडा-बृहत् नोईडा, हैदराबाद, जयपूर, कोलकाता व  गुरुग्राम यांचा समावेश आहे. एमसीएफ कारखान्यात या डब्यांच्या निर्मितीसाठी रोबोटचा वापर केला जाणार आहे.

चीनपेक्षा ४० टक्के कमी किंमत

चीनपेक्षा ४० टक्के कमी किमतीत हे डबे तयार करण्यात येणार असून त्याच वायफाय, सीसीटीव्ही, मोबाइल चार्जिग या सुविधा दिल्या जाणार आहेत. या क्षेत्रातील तंत्रज्ञानात बॉम्बार्डियर, अलस्टॉम (फ्रान्स), कावासाकी (जपान), मित्सुबिशी (जपान) या कंपन्या आघाडीवर आहेत.

ट्रेन १८चे ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ नामकरण

भारतीय रेल्वेने मेक इन इंडिया प्रकल्पात तयार केलेल्या ट्रेन १८ या गाडीचे नामकरण वंदे भारत एक्स्प्रेस असे करण्यात आल्याची माहिती रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी रविवारी दिली. ही गाडी दिल्ली ते वाराणसी दरम्यान कमाल ताशी १६० कि.मी. वेगाने धावणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लवकरच या गाडीला हिरवा झेंडा दाखवणार आहेत.

ही गाडी १६ डब्यांची असून, रायबरेली येथील मॉडर्न कोच फॅक्टरीत तिची निर्मिती १८ महिन्यांत करण्यात आली आहे. तीस वर्षे जुन्या शताब्दी एक्स्प्रेसची जागा ही गाडी घेणार आहे. ही गाडी पूर्ण वातानुकूलित असून, ती कानपूर व अलाहाबाद येथे थांबवणार आहे. ही गाडी पूर्णपणे भारतात तयार केलेली असून, लोकांनी या गाडीला वेगवेगळी नावे सुचवली होती, त्यातील वंदे भारत हे नाव निवडण्यात आले आहे. प्रजासत्ताकदिनी ही गोड भेट असून, पंतप्रधान मोदी या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवतील अशी माहिती गोयल यांनी दिली आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button