मुळशी धरणातून विसर्ग वाढविला; नदीकाठच्या गावांना अतिदक्षतेचा इशारा
आज शुक्रवारी बारा वाजल्यापासून 12 हजार क्युसेकने विसर्ग सुरू
पिंपरी |महाईन्यूज|
मुळशी धरणातून आज शुक्रवारी, सकाळी दहा वाजेपासून 12 हजार क्युसेकने विसर्ग सुरू केला आहे. त्यामुळे आता एकूण विसर्ग 16 हजार 247 ने सुरू झाला आहे. मुळा नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार असून, नदीकाठच्या वाकड, पिंपळे निलख, जुनी सांगवी, दापोडी, बोपखेल, पुण्यातील खडकी, बाणेर, बोपोडी, औंध गावांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.
याबाबत मुळशी धरण प्रमुख (टाटा पॉवर) बसवराज मुन्नोळी यांनी पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका पूर नियंत्रण कक्ष, पुणे-पिंपरी-चिंचवड, पाटबंधारे विभाग कार्यकारी अभियंता, शाखा अभियंता पिरंगूट, मुळशी तहसीलदार मुळशी व पोलिसांना कळविले आहे.
मुळशी तालुक्यात मुळा नदीवर मुळशी धरण आहे. मुळा नदी मुळशी तालुक्यातून येऊन वाकड व बाणेरच्या शिवेवर पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात प्रवेश करते. जुनी सांगवी येथे मुळा व पवना नदीचा संगम होतो. संगमाच्या एका बाजूला पुण्यातील बोपोडी व दुसऱ्या बाजूला पिंपरी-चिंचवडमधील दापोडी आहे. येथून पुढे मुळा नदी पुण्यात मुठा नदीला मिळते. येथून पुढे त्यांची ओळख मुळा-मुठा अशी होते.