breaking-newsपुणे

मुठेचा उजवा कालवा खचल्याने दांडेकर पुल परिसरात हाहाकार

पुणे (महा ई न्यूज) – खडकवासला धरणातून पुणे शहराला आणि पुढे जिल्ह्याच्या पूर्व भागात जाणारा मुठा उजवा कालवा आज दांडेकर पुलाजवळ सकाळी सव्वाअकराच्या सुमारास फुटल्याने सिंहगड रस्त्यावर हाहाकार उडाला आणि क्षणातच होत्याच नव्हतं झालं.

कॅनॉलमधून मोठया प्रवाहाने बाहेर पडलेल्या पाण्याने दुचाकी-चारचाकी आपल्या कवेत सामावून घेत थेट रस्ता व्यापला आणि पलीकडेच असणाऱ्या झोपडपट्टीत पाणी घुसले, अचानक घुसलेल्या पाण्याने नागरिकांचे भंबेरी उडाली. पाण्याचा प्रवाह इतका भयानक होता की काही झोपडपड्या थेट वाहून गेल्या या बरोबरच काही नागरिक वाहून गेल्याची भीती येथील नागरिक व्यक्त करीत आहेत. मात्र, याला अद्याप प्रशासनाने दुजोरा दिला नाही.

अग्निशामक जवानांनी धाव घेत झोपड्यामध्ये अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढले. मात्र, ही आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी महापालिका प्रशासन सपशेल अपयशी ठरले. पोलीस यंत्रणाही गाफिल राहिल्याने घटनास्थळावर मोठी गर्दी आणि वाहतूक कोंडी झाली आहे.

सकाळी सव्वाअकरा वाजता घडलेल्या घटनेचा आढावा घेण्यासाठी स्थानिक नगरसेवक आणि महापौर दुपारी सुमारे एक ते दीड वाजता पोहोचल्याने संतप्त नागरिकांनी महापौरांसाहित स्थानिक नगरसेवकांना घेराव घालत जाब विचारला.

दरम्यान, या सगळ्यात आपल्या डोळ्यासमोर रात्रंदिवस कष्ट करून उभा केलेला संसार वाहून जात असताना महिलांना मात्र अश्रू अनावर होत होते. अखेर त्यांनी टाहो फोडत या हृदयद्रावक घटनेचा जाब प्रशासनाला विचारला पण प्रशासनाकडे याचे काहीच उत्तर नव्हते.

पाणी शिरल्यामुळे नागरिकांच्या घरांच्या भितींना तडे गेले आहेत तसेच जमिनीवर असलेल्या फरशीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. आता जगायचे कसे, असा प्रश्न या भागातील नागरिकांच्या पुढे उभा राहिला आहे.

या भागातील सर्वच नागरिकांचे पोट हातावर असल्यामुळे बहुतांशी नागरिक सकाळीच कामावर गेले होते. घरांमध्ये केवळ महिला आणि लहान मुले होती. घरात पाणी शिरल्यामुळे त्यांना काहीच सूचत नसल्याचे दिसून आले. महिलांनीच घरात शिरलेले पाणी बाहेर काढण्यास सुरूवात केली. मात्र, पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे पाणी काढण्यामध्ये अडचणी येत होत्या.

घरातील सर्व वस्तू तसेच टीव्ही, फ्रीज अंथरून आणि इतर वस्तू पाण्याने भिजलेल्या असल्यामुळे त्याचे नुकसान झाले आहे. यामुळे महिला वर्गामध्ये एक प्रकारे भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, कोलमडलेला संसार कसा सावरायचा हा प्रश्न उभा ठाकला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button