breaking-newsपुणेमहाराष्ट्र

मुख्यमंत्री ‘ते’ कर्जत जामखेडसाठी नाही, कोथरूडकरांसाठी बोलले : अमोल कोल्हे

विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. १९ ऑक्टोबरला प्रचार तोफा थांबणार असून, विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांना कोंडीत पकडण्याची एकही संधी सोडत नसल्याचे दिसत आहे. दरम्यान, कर्जत जामखेडमधील प्रचारसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांच्यावर टीका केली होती. त्यांच्या टीकेला राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात भाजपाचे राम शिंदे आणि राष्ट्रवादीचे रोहित पवार यांच्या लढत होत आहे. राम शिंदे यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत हे पार्सल परत पाठवा, अशी टीका फडणवीस यांनी रोहित पवार यांच्यावर केली होती. मुख्यमंत्र्यांच्या टीकेला राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी उत्तर दिलं आहे. “मुख्यमंत्र्यांनी पार्सल परत पाठवा असं सांगितलं. मात्र, ते विधान त्यांनी कर्जत जामखेडसाठी केलेलं नव्हतं तर कोथरूडकरांसाठी केलं होतं,” असा टोला खासदार कोल्हे यांनी लगावला.

रोहित पवार यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत बोलताना खासदार अमोल कोल्हे म्हणाले, “महाराष्ट्रातील दोन मतदारसंघ आहेत. ज्यांच्याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. कर्जत जामखेड, वरळी मतदारसंघात भावी नेतृत्वाचा कस लागणार आहे. मात्र, एकजण मऊ गालिचावरून चालत आहे. तर दुसरीकडं काट्याकुट्यातून चालत वाट निर्माण करणारं नेतृत्व आहे. तुम्हाला नेता लाभला नाही. तर हक्काचा दादा लाभला आहे,” असं सांगत त्यांनी आदित्य ठाकरेंवरही टीका केली.

यावेळी कोल्हे यांनी शायरीतून राम शिंदे यांच्यावरही टीकास्त्र सोडले. ‘तु शेर है जिस जंगल का, लेकीन हम वो शिकारी है, जो तुझे तेरे जंगल मे आके ठोक देंगे’ असं सांगत जर कोणाला आमदारकीचा अथवा खासदारकीचा गर्व झाला असेल तर वेळ नक्कीच बदलते,” असं कोल्हे म्हणाले.विधानसभा निवडणुकीसाठी कर्जत जामखेड मतदारसंघातून पवार विरूद्ध शिंदे अशी लढत होत आहे. विशेषतः रोहित पवार हे शरद पवार यांचे नातू आहेत. तर राम शिंदे हे राज्यमंत्री होते. त्यामुळे या मतदारसंघात रंगदार निवडणूक बघायला मिळणार आहे. रोहित पवार यांचा या मतदारसंघात दांडगा जनसंपर्क असून, ही जागा धोक्यात असल्याचं भाजपाच्याच सर्व्हेेक्षणात दिसून आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button