breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

मुंबई, ठाण्यावर पाणीसंकट ; जलाशयांत अवघे २० दिवस पुरेल इतकाच साठा

मुंबई : मुंबई आणि ठाण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये पुढील २० दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक असून पाऊस झाला नाही, तर पाणीसंकट अधिकच तीव्र होण्याची भीती आहे. ठाण्यात आधीच ३० टक्के पाणीकपात लागू असल्याने नागरिक या पाणीबाणीने चिंतित आहेत.

मुंबईकरांना दररोज उर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, विहार, तुळशी, भातसा आणि मध्य वैतरणामधून ३,६५० दशलक्ष लिटर पाणी जलशुद्धीकरण संकुलात आणले जाते. शुद्धीकरणानंतर मुंबईकरांना ३,५१५ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो. यापैकी १३५ दशलक्ष लिटर पाणी गळतीमुळे  वाया जाते. या सातही तलावांमध्ये २६ जून रोजी सकाळी ६ वाजता सुमारे ७३ हजार ७८४ दशलक्ष लिटर पाणी साठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी याच दिवशी २ लाख ५३ हजार ०४३ दशलक्ष लिटर पाणी तलावात होते.

जून महिना संपत आला तरी पाऊस पडत नसल्यामुळे पालिकेच्या जल विभागातील अधिकारी चिंतीत झाले आहेत. दरवर्षी साधारण ७ जून रोजी मुंबईत मान्सून दाखल होतो. त्यानंतर दमदार पावसाला सुरुवात होते आणि हळूहळू जुलैच्या दुसऱ्या पंधरवडय़ात मुंबईकरांची तहान भागविणारे तलाव एकामागोमाग एक भरून ओसंडून वाहू लागतात. मात्र यंदा जूनमध्ये तुरळक सरी कोसळल्यानंतर पावसाने दडी मारली आहे.

ठाण्यात कपातीत वाढ?

धरण क्षेत्रात पुरेसा पाऊस झाला नसल्यामुळे ठाणे शहरातील पाणी कपातीत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

ठाणे जिल्ह्य़ातील बारवी आणि भातसा या दोन धरणांमधून ठाणे तसेच आसपासच्या शहरांना पाणी पुरवठा केला जातो. बारवी धरणाचे पाणी उल्हास नदीत सोडले जात असून तेथून स्टेम प्राधिकरण आणि  ‘एमआयडीसी’ पाणी उचलते. तर भातसा धरणावरील नदी पात्रातून ठाणे महापालिका स्वत:च्या योजनेसाठी पाणी उचलते. या दोन्ही धरणातील पाणी साठा १५ जुलैपर्यंत पुरविण्यासाठी सहा महिन्यांपूर्वीच जलसंपदा विभागाने पाणी कपात लागू केली होती. यामुळे आठवडय़ातून एक दिवस शहराचा पाणी पुरवठा बंद ठेवला जात आहे. या बंदमुळे पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.

शहरातील बडय़ा गृहसंकुलांना टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. अशीच काहीशी अवस्था जिल्ह्य़ातील इतर शहरांची आहे.

तलावांनी तळ गाठला..

मुंबईकरांची तहान भागविणाऱ्या सातही तलावांनी तळ गाठला असून आजघडीला या या तलावांमध्ये मिळून ७३ हजार ७८४ दशलक्ष लिटर पाणी शिल्लक आहे. तर, ठाण्याची मदार असलेल्या बारवी आणि भातसा या दोन्ही धरणांमध्ये केवळ १४ टक्के इतकाच पाणी साठा शिल्लक आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button