breaking-newsताज्या घडामोडीपुणे

मुंबईनंतर आता लवकरच पुण्यात देखील जमावबंदीचे आदेश निघणार

मुंबईनंतर आता लवकरच पुण्यात देखील जमावबंदीचे आदेश निघणार आहेत.पुण्यात दोघांपेक्षा अधिक नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी गर्दी करता येणार नाही. शहरातील दैनंदिन व्यवहारांवर कोणतीही गदा येणार नसून, केवळ एका वेळी होणारी गर्दी टाळण्यासाठी जमावबंदीचे नवीन आदेश काढण्यात येणार आहेत.

सार्वजनिक ठिकाणी, सरकारी, तसेच खासगी कार्यालयांमध्येही मास्क लावण्याबरोबरच सुरक्षित वावर राखण्याची बंधने असतानाच आता दुकाने, हॉटेल, पानटपरी, चहाच्या अड्ड्यांवर होणारी गर्दी रोखण्यासाठी पुणे महापालिकेने मुंबईच्या धर्तीवर पुण्यातही बंधने आणण्यासाठी चाचपणी सुरू केली आहे. यामुळे दोघांपेक्षा अधिक नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी गर्दी करता येणार नाही. शहरातील दैनंदिन व्यवहारांवर कोणतीही गदा येणार नसून, केवळ एका वेळी होणारी गर्दी टाळण्यासाठी जमावबंदीचे नवीन आदेश काढण्यात येणार आहेत. पालकमंत्री
अजित पवार यांच्या म्हणजे शुक्रवारी होणाऱ्या बैठकीत त्यावर अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.

मुंबई पोलिसांनी बुधवारी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले असून, त्यामध्ये नागरिकांच्या फिरण्यावर; तसेच एकत्र येण्यावर बंधने घालण्यात आली आहेत. नेहमीप्रमाणे काढण्यात येणाऱ्या प्रतिबंधात्मक आदेशांमध्ये पाचहून अधिक नागरिकांना एकत्र येण्यास मज्जाव करण्यात येते. मात्र, पुण्यात काढण्यात येणाऱ्या आदेशांमध्ये दोघांपेक्षा अधिक नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी एकत्र येण्यास मज्जाव करण्याचा विचार सुरू आहे. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी त्यास दुजोरा दिला असला तरी अंतिम निर्णय हा पालकमंत्री अजित पवार यांच्या बैठकीत घेतला जाणार आहे.

मुंबई पोलिसांनी काढलेल्या आदेशांमध्ये राज्य सरकारने ‘अनलॉक’ संदर्भात ३१ ऑगस्टनुसार दिलेल्या आदेशांचे पूर्णपणे पालन करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. त्याप्रमाणे पुण्यातही सरकारच्या या आदेशांचे पालन करण्यात येणार आहे. यामध्ये सध्या सुरू असलेले दैनंदिन व्यवहार सुरू राहणार आहेत. हे व्यवहार करताना विनाकारण होणारी गर्दी टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाईचा बडगा उगारण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. हॉटेल, पानटपरी, चहाचे अड्डे, दुकाने; तसेच ‘वाइन शॉप’च्या दारात होणारी गर्दी टाळण्यासाठी हे आदेश काढण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.

पोलिस आणि महापालिकेने मास्क न वापरणाऱ्या नागरिकांविरोधात कठोर कारवाई सुरू ठेवली आहे. त्यात आता विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या आणि गर्दी करणाऱ्यांवर नागरिकांवरही कारवाई करण्यात येणार आहे. महापालिका आयुक्तांनी यापूर्वी काढलेल्या आदेशांनुसार ‘मिशन बिगिन अगेन’चे नियम न पाळल्याने व्यावसायिकांवर कारवाई सुरू केली आहे. ग्राहकांचा सुरक्षित वावर नसणे, दुकानांमध्ये सॅनिटायझर न ठेवणे आदी नियम मोडल्याने दुकाने ४८ तासांसाठी ‘सील’ करण्यात येत आहे. त्याचाच पुढचा भाग म्हणून सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात येणार आहे.

महापालिका आयुक्तांच्या आदेशांनुसार पोलिसांकडून स्वतंत्रपणे प्रतिबंधात्मक आदेश काढण्यात येतील. त्यामध्ये दिलेल्या आदेशांचे पालन न केल्यास ‘भारतीय दंड संहिता कलम १८८’नुसार नागरिकांवर गुन्हा दाखल होऊ शकतो. त्यामुळे चहाच्या टपरीवर गर्दी केल्याने संबंधितावर गुन्हाही दाखल होण्याची शक्यता आहे.

करोनाचा संसर्ग वेगाने पसरत असून तो रोखण्यासाठी नागरिकांच्या फिरण्यावर, गर्दी करणाऱ्यावर बंधने आणणे गरजेचे आहे. त्यासाठी मुंबई पोलिसांनी काढलेल्या आदेशांच्या अनुषंगाने पुण्यातही प्रतिबंधात्मक आदेश काढता येतात का, याची चर्चा सुरू आहे. पालकमंत्री अजित पवार यांच्या बैठकीतच याबाबतचा अंतिम निर्णय होईल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button