breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

मुंबईतील व्यापाऱ्यांवर अफूचा अंमल

तंबाखूऐवजी गूळमिश्रित अफूची गोळी तोंडात ठेवून धंदा

तासन्तास एकाच जागी बसून व्यापार करणाऱ्या शहरातील उच्चभ्रू वर्गात तंबाखू, गुटख्याऐवजी गूळमिश्रित अफूच्या गोळीची सवय लागल्याने मुंबईत अफूची तस्करी वाढू लागली आहे. नेपाळहून मुंबईत आलेले उच्च दर्जाचे अफू नुकतेच अंमली पदार्थविरोधी पथकाने पकडले. त्या वेळी करण्यात आलेल्या तपासादरम्यान ही माहिती समोर आली आहे.

गेल्या आठवडय़ात शनिवारी पी. डी’मेलो मार्गावर सापळा रचून अंमली पदार्थविरोधी पथकाच्या आझाद मैदान कक्षाने भारीलाल खत्री(३६) या नेपाळी नागरिकाला एक किलो अफू साठय़ासह पकडले. खत्रीने दिलेल्या माहितीनुसार गेल्या काही महिन्यांमध्ये मुंबईतील अंमली पदार्थ विक्रेत्यांकडून शुद्ध किंवा उच्च दर्जाच्या अफूची मागणी वाढली. खत्रीने दिलेल्या माहितीनुसार पथकाने अधिक चौकशी केली असता शहरातील व्यापारी वर्गात तंबाखू, गुटख्याऐवजी अफूची नशा वाढल्याची माहिती मिळाली.

औषधनिर्मितीसाठी अफू वापरले जाते. मात्र शुद्ध अफूचा साठा शहरात सहसा येत नव्हता. मागील दहा वर्षांत शहरात अफू आल्याची किंवा हस्तगत केल्याची नोंद मुंबई पोलिसांच्या अभिलेखावर नव्हती. शिवाय अफूची लागवड राजस्थान, मध्य प्रदेश आणि त्याखालोखाल पश्चिम बंगालमध्ये होते. आरोपीकडून हस्तगत केलेले अफू नेपाळहून आल्याने पथकाने या प्रकरणावर विशेष लक्ष केंद्रित केले.

अंमली पदार्थविरोधी पथकाचे उपायुक्त शिवदीप लांडे यांनी  सांगितले की, दक्षिण मुंबईतील मोठय़ा बाजारपेठांमधील व्यापाऱ्यांसाठी ही खेप आली होती. अफूत गूळ मिसळून ते मिश्रण तंबाखूप्रमाणे जिभेखाली ठेवून तासन्तास एका जागी बसून काम करण्याचे प्रमाण वाढले आहे. आरोपीच्या चौकशीतून ही पद्धत व्यापारीवर्गात जास्त असल्याची माहिती पुढे आली.

कर्जत येथे मजुरी करणाऱ्या खत्रीचा अफू तस्करांनी वाहक म्हणून वापर केला. गोरखपूरमार्गे मुंबईत आलेल्या खत्रीने अंतर्वस्त्रात दडवून त्याने हा साठा आणला. त्याच्यासोबत आणखी १२ नेपाळी तरुण मुंबई-ठाण्यात आले. त्यांचा शोध सध्या सुरू असल्याचे पथकाने सांगितले. खत्रीकडून हस्तगत केलेल्या अफू साठय़ाची किंमत १० लाख रुपये इतकी मोजण्यात आली.

साडेतीन कोटींचे कोकेन हस्तगत

कोपरखरणे येथे वास्तव्यास असलेल्या केनियन तरुणाला पथकाच्या वांद्रे कक्षाने खारदांडा येथून अटक केली. त्याच्याकडून ५१०ग्रॅम कोकेन हस्तगत करण्यात आले. या साठय़ाची किंमत साडेतीन कोटी रुपये असल्याचे पथकाने स्पष्ट केले. अटक आरोपी आंतरराष्ट्रीय टोळीचा कोकेन तस्कर टोळीचा वाहक आहे. कोकेन भरलेल्या कॅप्सूल पोटात दडवून मुंबईत आणायच्या आणि येथील विक्रेत्यांच्या स्वाधीन करायच्या, ही त्याची जबाबदारी होती. त्यासाठी प्रत्येक खेपेला त्याला मोबदला मिळत होता, अशी माहिती पथकाने दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button