मी दाऊदशी बोललोय, त्याला दमही दिलाय – शिवसेना खासदार संजय राऊत
पुणे|महाईन्यूज|प्रतिनिधी
‘मी दाऊद इब्राहिमला पाहिले असून, त्यांच्याशी बोललोय, इतकेच नाही त्याला मी दमही दिला आहे’, असा गौप्यस्फोट शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुण्यातील जाहीर मुलाखतीत केला आहे. तसेच ‘समोर पंतप्रधान असो, गृहमंत्री असो की गुंड असो, मी कुणाला घाबरत नाही. तुम्ही घाबरला नाहीत, तर तुमचं कुणी वाकडं करून शकत नाही’, असेही त्यांनी सांगितले.
‘आता अंडरवर्ल्ड राहिलेलं नाही. आता काहीच नाही. तेव्हाच्या काळातील अडरवर्ल्ड काय होतं हो आम्ही पाहिलेलं आहे. त्या काळात मुंबईचं अंडरवर्ल्ड हे शिकागोच्या अंडरवर्ल्डपेक्षा अधिक गंभीर होतं. त्या काळात गुंडाला भेटायला अख्खं मंत्रालय खाली येत असे. करीम लालाला भेटण्यासाठी इंदिरा गांधीही आल्या होत्या. लोक मला एकेकाळी गुंड म्हणत असत. चांगलं आहे. गुंड म्हणजे चांगलं काम करणारा माणूस. ऐसा पुत्र व्हावा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा’, असं म्हणताच उपस्थितांनी टाळ्यांनी राऊत यांच्या वक्तव्याचं स्वागत केलं.