breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

मावळात शिवसेना ‘हॅट्रीक’ करण्याचा निर्धार

  • मावळचे प्रश्न दिल्लीत मांडून सोडविण्याची क्षमता फक्त बारणे यांच्यामध्येच – बानगुडे पाटील

पिंपरी ( महा ई न्यूज ) – खासदार श्रीरंग बारणे यांनी महाराष्ट्राची अस्मिता जपत दिल्लीमध्ये मराठी आवाज बुलंद केला. देशाच्या संसदेमध्ये सर्वात जास्त प्रश्न विचारणारा खासदार, सर्वात जास्त उपस्थित राहणार खासदार म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला. मावळ मतदारसंघातील प्रश्न दिल्लीत मांडून ते सोडविण्याची क्षमता फक्त बारणे यांच्यामध्येच आहे. त्यामुळे मावळात शिवसेनेच्या विजयाची हॅटट्रीक होईल, असा विश्वास शिवसेनेचे उपनेते प्रा. नितीन बानगुडे पाटील यांनी व्यक्त केला.

थेरगाव येथे प्रा. नितीन बानगुडे पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा निर्धार मेळावा उत्साहात पार पडला. या निर्धार मेळाव्यात उपस्थित शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना बानगुडे पाटील बोलत होते. मेळाव्यासाठी खासदार श्रीरंग बारणे, आमदार गौतम चाबुकस्वार, पिंपरी-चिंचवड शहर सल्लागार मधुकर बाबर, जिल्हाप्रमुख मावळ गजानन चिंचवडे आदी उपस्थित होते.

प्रा. नितीन बानगुडे पाटील म्हणाले, “निरोगी शरीरासाठी चांगला आणि अनुभवी डॉक्टर हवा, त्याचप्रमाणे सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आणि देशाचा कारभार चालविण्यासाठी अनुभवी आणि चांगला खासदार हवा. एखाद्या गोष्टीचं ज्ञान नसताना देखील त्याला विद्वान म्हणण्याचा प्रकार राष्ट्रवादी पक्षात चालतो. शिवसेनेत विद्वत्तेला प्राधान्य दिलं जातं. प्रत्येक कार्यकर्त्यांमध्ये आणि सर्वसामान्यांमध्ये विदवत्ता निर्माण करण्याचे काम शिवसेना पक्ष करत आहे. आजवर देशाच्या राजधानीत मराठी माणसाला आवाज नाही, मराठी माणूस दिल्लीत जाऊन केवळ मुजरे करतो, असं ऐकलं होतं. मात्र श्रीरंग बारणे यांनी हा प्रघात मोडीत काढून महाराष्ट्राची अस्मिता जपत मराठी आवाज बुलंद केला. देशाच्या संसदेमध्ये सर्वात जास्त प्रश्न विचारणारा खासदार, सर्वात जास्त उपस्थित राहणार खासदार म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला आहे.

आपल्या मतदार संघातील प्रश्न देशाच्या राजधानीत मांडून त्यावर तोडगा काढण्यासाठी श्रीरंग बारणे यांनी अविरत प्रयत्न केले आहेत. देशाच्या विकासासाठी स्थिर सरकार असणे आवश्यक आहे. शिवसेना आणि भाजपच्या महायुतीमुळे हे स्थायी सरकार तयार होणार आहे. श्रीरंग बारणे यांनी मावळ लोकसभा मतदार संघात अनेक विकासकामे केली आहेत. ही कामे आता सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवली पाहिजेत. काहीजण काम मुंगीएवढं करतात आणि त्याचा प्रचार हत्ती एवढा करतात. पण बारणे यांचं काम हत्तीएवढं आहे. त्यामुळे त्याचा प्रचार देखील हत्तीएवढाच व्हायला हवा. मावळ लोकसभेसाठी खासदार म्हणून श्रीरंग बारणे च कायम सार्थ ठरतील, असेही बानगुडे पाटील म्हणाले.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून सर्वाधिक काळ सत्ता उपभोगणा-यांनी देशाचा रंग उडवला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने बेरंग केला आहे. त्या बेरंगाचा रंग करण्याची ताकद श्रीरंग बारणे यांच्यामध्ये आहे. श्रीरंग बारणे हे मावळ लोकसभा मतदार संघासाठी योग्य उमेदवार आहेत. असे मत बानगुडे पाटील यांनी व्यक्त केले.

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, “श्रीरंग बारणे हे शिवसेनेचे उमेदवार नाहीत, तर ते महायुतीचे उमेदवार आहेत. असा निर्धार पनवेल येथील मेळाव्यात झाला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा विश्वास, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची साथ यामुळे राजकीय क्षेत्रात नवी उंची मिळाली आहे. आजवर नागरिकांनी दाखवलेला विश्वास प्रत्येक क्षणी लोकसभेत सार्थ केला आहे. दिल्लीमध्ये मराठीला आवाज नाही, हा पायंडा मोडून काढून सर्वात जास्त प्रश्न विचारण्याचा विक्रम केला. स्वातंत्र्यानंतर सहा दशकांमध्ये मावळ लोकसभा मतदार संघातील काही दुर्गम आदिवासी पाड्यांकडे कधीच कुणाचं लक्ष गेलं नाही, तिथं पोहोचून तिथल्या लोकांना रस्ते, वीज यांसारख्या मूलभूत सोयी पुरविल्या आहेत. जिथं शासकीय योजना पोहोचत नाही, तिथं शिवसेनेच्या माध्यमातून काम केलं आहे.

केवळ आश्वासने दिली नाहीत. तर प्रत्यक्ष काम करून दाखवलं आणि सर्वसामान्यांचा विश्वास मिळवला. सर्वसामान्यांना विकास हवा आहे. ते विकासालाच मत देणार आहेत. शिवसेनेच्या प्रत्येक कार्यकर्त्याने स्वार्थी आणि लबाड लोकांना दूर करायला हवं. सर्वसामान्य नागरिक महायुतीलाच मत देतील आणि पुन्हा एकदा भारत देश सुरक्षित हातामध्ये देतील, असा विश्वास देखील खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश बाबर यांनी केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button