breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘मावळते मुख्यमंत्री’ म्हणत शिवसेनेने देवेंद्र फडणवीसांना डिवचले

मुंबई – महाराष्ट्रातील सत्ता स्थापण्याचा भाजप-शिवसेनेतील संघर्ष संपता संपेना. त्यातच आज (मंगळवार) पुन्हा शिवसेनेने ‘सामना’ या आपल्या मुखपत्रातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. आपल्या अग्रलेखात देवेंद्र फडणवीस यांचा ‘मावळते मुख्यमंत्री’ असा उल्लेख करत त्यांना डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सत्तास्थापनेचा घोळ घालायचा व त्या परिस्थितीचा लाभ घेऊन सरकार नसतानाही अप्रत्यक्ष सूत्रे हातात ठेवून राज्यकारभार हाकायचा हे घटनाविरोधी आहे. महाराष्ट्राच्या जनतेने कौल दिला आहे. दिल्लीच्या गढूळ वातावरणातून मावळते मुख्यमंत्री महाराष्ट्रात उतरतील तेव्हा त्यांना पुढचे पाऊल टाकावेच लागेल. सध्या शिवसेनेला ओल्या दुष्काळाची आणि महागलेल्या भाजीपाल्याची चिंता असल्याचे ही म्हटले.

काय म्हटलंय शिवसेनेने…

भाजपच्या विधिमंडळ पक्षाचे नेते व सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत जाऊन गृहमंत्री अमित शहा यांना भेटले. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र सदनाबाहेर पत्रकारांना सांगितले की, ‘महाराष्ट्रात सरकार स्थापन होणार व आपण स्वतः मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार.’ मुख्यमंत्र्यांच्या या शब्दांमुळे राज्यातील गुंता सुटेल व एक सरकार मिळेल असे समजायला हरकत नाही. फडणवीस हे अमित शहा यांना भेटून सरकार स्थापण्याचे भाष्य करतात म्हणजे नक्कीच त्यांनी जुळवाजुळव केली असेल. बहुमताचा आकडा वस्त्रगाळ करून जमवला असेल. जेव्हा अंतःकरण भरून येते तेव्हा आपल्या मनातील भावना आणि कल्पना व्यक्त करावयास शब्द अपुरे पडतात असे काहीसे मा. मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत दिसले. दिल्लीची हवा सध्या प्रदूषित आहे. धूळ व इतर विषारी द्रव्ये त्या हवेत पसरून सर्वत्र काळोख असल्यासारखे चित्र दिसत आहे.

दिल्लीची हवा गढूळ, विषारी असली तरी महाराष्ट्राची हवा स्वच्छ व शुभ्र आहे. प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट स्पष्ट आणि लख्ख दिसत आहे. कोणाचे काय चालले आहे व कोणाच्या काय भावना आहेत ते लपून राहिलेले नाही. महाराष्ट्राची हवा गढूळ नसली तरी ओला दुष्काळ आणि महागाईच्या आगीत जनतेची कोंडी झाली आहे. गॅसचा सिलिंडर ६५१ रुपये झाला, कोथिंबिरीची जुडी १०० रुपये पार झाली. भाजप १४४ पार झाला नाही व शिवसेनाही शंभर पार झाली नाही तरी गाजर, मटार, भेंडी, आले, गवारसारख्या भाज्यांनी ‘१२०’ पार केले आहे. हे सगळे कसे शमवायचे? हा प्रश्नही आहेच. सरकार स्थापनेसाठी ‘आकडा’ वाढता असणे आवश्यक असले तरी भाजीपाल्याच्या वाढलेल्या दराचा आकडा लवकर कमी होणे त्यापेक्षा जास्त आवश्यक आहे.

गृहमंत्री अमित शहा, पंतप्रधान मोदी एका बाजूला, तर दुसरीकडे शरद पवार हे सोनिया गांधी यांना भेटून नक्की काय जुळवाजुळव करतात ते पाहणे रंजक ठरेल. महाराष्ट्रात लवकरात लवकर नवे सरकार स्थापन होणे हे देशाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे, तितकेच ते राज्याच्या मराठी जनतेसाठी महत्त्वाचे आहे. लोकांचा तो अधिकार आहे, पण सत्तास्थापनेचा घोळ घालायचा, खोळंबा करायचा व त्या परिस्थितीचा लाभ घेऊन सरकार नसतानाही अप्रत्यक्ष सूत्रे हातात ठेवून राज्यकारभार हाकायचा हे घटनाविरोधी आहे, असा आरोप सेनेने केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button