breaking-newsताज्या घडामोडी

मालेगावच्या कोरोनामुक्तीसाठी प्रशासनाने केलेले प्रयत्न राज्यातील एक यशस्वी मॉडेल : महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

नाशिक | महाईन्यूज | प्रतिनिधी


संपूर्ण जग, देश, राज्य आणि नाशिक जिल्हा अडीच महिन्यांपासून कोरोना संकटाचा सामना करतोय, राज्यातील सर्वच ठिकाणी कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न केले; काही संवेदनशील ठिकाणी विशेष काळजी घेतली गेली त्यात नाशिक जिल्ह्यातील मालेगांवचा समावेश होता. सुरूवातीला मालेगावातील वाढलेली रूग्णसंख्या ही राज्याच्या चिंतेची बाब वाटत होती, परंतु प्रशासकीय पातळीवरील आपआपसातील जबाबदारी वाटपाच्या सुत्रामुळे आज मालेगावचे चित्र सकारात्मकदृष्ट्या बदलले आहे व मालेगावच्या कोरोनामुक्तीसाठी जिल्हा प्रशासनाने केलेले प्रयत्न राज्यातील एक यशस्वी मॉडेल म्हणून समोर येताना दिसतेय, असे प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज येथे केले.

आज जिल्ह्यातील कोरोना नियंत्रण व निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभुमीवर गोल्फ क्लब शासकीय विश्रामगृहात आयोजित प्रमुख अधिकाऱ्यांच्या बैठकीत मंत्री श्री. थोरात बोलत होते. यावेळी खासदार हेमंत गोडसे, विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, सहाय्यक पोलीस आयुक्त लक्ष्मीकांत पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक सुरेश जगदाळे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना मंत्री श्री. थोरात म्हणाले, नाशिक शहर व जिल्ह्यात परजिल्ह्यातून आलेल्या लोकांमुळे कोरोना रूग्णांची संख्या वाढलेली दिसून येते. परंतु प्रशासनाच्या सतर्कतेमुळे त्यावर तात्काळ उपाययोजना केल्या जात आहेत. बाहेरून आलेल्या नागरीकांना थेट घरी न पाठवता त्याला संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात येत आहे, अशा प्रकारे प्रशासकीय पातळीवरील प्रयत्नांनुळे आज परिस्थिती नियंत्रणात आहे. त्याचे दृश्य परिणाम मालेगांवात दिसून येत आहेत मालेगावात आज रूग्ण संख्या व कोरोनामुळे होणाऱ्या मृत्युचे प्रमाणही कमी होताना दिसतेय, असेही यावेळी मंत्री थोरात यांनी यावेळी सांगितले.

नाशिक शहर, ग्रामीण व मालेगावातील प्रशासनातील अधिकाऱ्यांनी अतिशय जबाबदारीने हा कालखंड हताळला आहे. संकट अजून संपलेले नाही; अजूनही काळजीचा मोठा कालखंड समोर दिसतोय, सतर्क राहिल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. ही सतर्कता कायम ठेवण्यात यावी. हे संकट लगेचच दूर होईल असे नाही, त्यासाठी लोकजागृती व स्वयंशिस्त आपल्याला कायम ठेवावी लागणार आहे. अशा परिस्थितीत जनतेतल्या प्रत्येकाने आपण काय करायला हवे, याची जाणीव ठेवायला हवी. गेल्या अडीच महिन्यात लोकांना बरीच समज आलेली दिसून येते, लोकांनीही आता स्वत:साठी, कुटुंबासाठी, समाजासाठी काळजीने वागण्याचे आवाहन यावेळी करताना शासन, प्रशासन कोरोनाच्या या युद्धात जनतेसोबत आहे, असेही मंत्री थोरात यांनी सांगितले.

निसर्ग चक्रीवादळातील नुकसानीचे तात्काळ पंचनामे व मदत

कोरोना सोबतच निसर्ग चक्रीवादळाचे नवे संकट राज्यात आले. हे वादळ कोकणातून नाशिक, नगर व उत्तर महाराष्ट्रातून जाणार याची जाणीव तीन ते चार दिवस अगोदर होती, त्यामुळे शासन-प्रशासन सावध होते. संकट अगदी जवळून गेले असे म्हणावे लागेल. मुंबईत त्याचा फारसा परिणाम दिसला नाही हे अतिशय महत्वाचे आहे. या चक्रीवादळात जिल्ह्यातील व उत्तर महाराष्ट्रातील झालेल्या नुकसानींचे पंचनामे सुरू आहेत;ते दोन दिवसात ओटोपून नुकसानग्रस्तांना मदत देण्याच्या दृष्टीने काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या असून लवकरच शासनस्तरावर मदतीची घोषणा करण्यात येईल, प्रशासनाच्या सतर्कतेमुळे व केलेल्या पूर्वतयारीमुळे आपण निसर्ग चक्रीवादळाचा सामना करू शकलो, असेही मंत्री बाळासाहेब थोरात यांनी यावेळी सांगितले.

यावेळी विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी कोरोना व निसर्ग चक्रीवादळासंदर्भातील वस्तुस्थितीशी मंत्री श्री. थोरात यांना अवगत केले.

लक्षणीय
◾कोरोनामुक्तीचा मालेगाव पॅटर्न मॉडेल म्हणून समोर योतोय.
◾प्रशासनातील आपआपसात जबाबदारी वाटपाचे सुत्र यशस्वी
◾नाशिक शहर व जिल्ह्यात परजिल्ह्यातून आलेल्या नागरिकांमुळे रूग्णसंख्येत वाढ
◾प्रशासकीय प्रयत्नांमुळे परिस्थिती नियंत्रणात; मालेगावात त्याचे दृश्य परिणाम
◾ संकट अजून संपलेले नाही; सतर्कता कायम ठेवावी
◾जनतेने स्वत:, कुटुंब व समाजासाठी स्वयंशिस्त पाळण्याचे आवाहन
◾निसर्ग चक्रीवादळाचे दोन दिवसात पंचनामे व तात्काळ मदत घोषित करणार

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button