breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

माढ्यात राष्ट्रवादीला मोठा धक्का; खासदार विजयसिंह मोहिते पाटील भाजपच्या वाटेवर

सोलापूर – राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते आणि माढ्याचे खासदार विजयसिंह मोहिते पाटील उद्या भाजपात प्रवेश करणार आहेत. या संदर्भात आज दुपारी ते कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहेत. शिवरत्न बंगल्यावर होणाऱ्या बैठकीत विजयसिंह मोहिते-पाटील भाजपामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय का घ्यावा लागला, यावर चर्चा करणार आहेत. राष्ट्रवादीतून उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी असल्यानं मोहिते-पाटील भाजपात जाणार आहेत. विजयसिंह यांचे पुत्र रणजीतसिंह माढ्यातून लोकसभा लढवणार आहेत. मुंबईत उद्या त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे, अशी माहिती मिळाली आहे.

माढा लोकसभा मतदार संघ राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो. हा बालेकिल्ला बांधण्यात मोहिते-पाटील कुटुंबाचा मोठा वाटा आहे. माढ्यातील कार्यकर्त्यांची फळी अतिशय मजबूत असल्यानंच गेल्या निवडणुकीत मोदी लाट असतानाही विजयसिंह मोहिते-पाटील यांनी माढ्याचा गड राखला होता. मात्र, यंदाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीनं प्रसिद्ध केलेल्या उमेदवारांच्या पहिल्या दोन याद्यांमध्ये मोहिते-पाटील यांच्या नावाचा समावेश नाही. त्यामुळेच विजयसिंह मोहिते-पाटील यांनी राष्ट्रवादीला रामराम करत भाजपामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. त्यांचे पुत्र रणजीतसिंह यांना भाजपानं माढ्यातून उमेदवारी देऊ केली आहे. उद्या मोहिते-पाटील भाजपामध्ये प्रवेश करतील, अशी माहिती आहे.

काही दिवसांपूर्वी रणजितसिंह मोहिते-पाटलांनी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली होती. त्यावेळी ते भाजपात प्रवेश करतील, अशी अटकळ बांधली जात होती. विशेष म्हणजे माढा लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या उमेदवारीलाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा कंदील दाखवला आहे. जिल्ह्यातील महाआघाडीचे नेते आमदार प्रशांत परिचारक, बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत आदी नेत्यांना याबाबतची माहिती दिली आहे.

बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी सायंकाळी मुंबईत बोलावून घेतले होते. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांना माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याबाबत विचारणा करण्यात आली होती. पण त्यांनी करमाळा विधानसभा मतदारसंघातच रस असल्याचे सांगितले. त्यामुळे भाजपाकडून रणजितसिंह मोहिते-पाटील यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button