breaking-newsताज्या घडामोडीपुणे

माऊलींचा ७२४ वा संजीवन समाधी दिन सोहळा अलंकापुरीत साजरा

पुणे – रूप पाहता लोचनी… रामकृष्णहरी…, ज्ञानोबा माऊलींचा नाम जयघोष…, पुंडलिका वरदे हरी विठ्ठलचा गजर…टाळ, मृदंग, वीणेचा त्रिनाद … हृदयस्पर्शी कीर्तनसेवेत संतमहिमा… हरिनाम जयघोष करीत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधीवर तुळशी फुलांसह विविधरंगी फुलांच्या पाकळ्यांची पुष्पवृष्टीसह मंदिरात घंटानाद होताच हृदयस्पर्शी वातावरणात माऊलींचा ७२४ वा संजीवन समाधी दिन सोहळा अलंकापुरीत सोमवारी (दि. २५) साजरा झाला.

याप्रसंगी नामदेवरायांचे १८ वे वंशज भावार्थ महाराज नामदास, माऊली मंदिरात प्रमुख विश्वस्त विकास ढगे पाटील, विश्वस्त अजित कुलकर्णी, अभय टिळक, योगेश देसाई, माजी विश्वस्त सुरेश गरसोळे, सु. वा. जोशी, पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर, नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, माजी नगराध्यक्ष राहुल चिताळकर पाटील, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख राम गावडे, चोपदार बाळासाहेब चोपदार, राजाभाऊ चोपदार, रामभाऊ चोपदार महाराज, फडकरी, दिंडीकरी, मानकरी उपस्थित होते.

माउली मंदिरातील वीणामंडपात परंपरेने संत नामदेवराय यांचे १८ वे वंशज भावार्थ महाराज नामदास यांची घरात दु:ख असताना परंपरेतील संतकार्याला प्राधान्य देत हृदयस्पर्शी कीर्तनसेवा झाली. तसेच महाद्वारात श्रीगुरु हैबतरावबाबा आरफळकर यांचे वतीने पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर याचे सूचनेने संदीप महाराज फणसे यांची कीर्तनसेवा झाली. तीर्थक्षेत्र आळंदी परिसरात श्रींचे संजीवन समाधी प्रसंगावर आधारित कीर्तनसेवा सुश्राव्य वाणीतून राज्यातील नामवंत कीर्तनकार महाराजांनी रुजू केली.

या संत नामदेवरायांचे अभंगावर आधारित नामदेवरायांचे वंशज भावार्थ महाराज नामदास यांनी आपल्या मंत्रमुग्ध करणाºया वाणीतून कीर्तनसेवा रुजू केली. माऊलींचे संजीवन समाधी सोहळ्यात कीर्तन करीत उपस्थितांच्या नेत्रांच्या कडा पाणावल्या. माऊलींचे समाधी सोहळ्याचे प्रसंगावर आधारित कीर्तनात भाविक भक्त भारावले. या वेळी भावार्थ महाराज यांनी संत ज्ञानेश्वर महाराज यांचे जीवनचरित्र अनेक संतांच्या संतवचनाचे दाखले प्रमाण देत सांगत कीर्तनसेवा रुजू केली.
आळंदीत श्रीचे संजीवन समाधी प्रसंगाचे वर्णन आणि जीवनचरित्र श्रवण करताना अनेक भाविकांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या आणि श्रींचे संजीवन समाधी प्रसंगाच्या कल्पनेने उपस्थित भाविकही गहिवरले. नामदास महाराज यांचे हृदयस्पर्शी भक्तीपूर्ण वातावरणात श्रीचे संजीवन समाधी सोहळा प्रसंगावर कीर्तन झाले.

माउलींच्या मंदिरात श्रींचे संजीवन समाधी दिनास विविध धार्मिक कार्यक्रमांनी भल्या पहाटेच सुरुवात झाली. पहाटे पवमान अभिषेक, दुधारती आळंदी देवस्थानचे सरपंच विकास ढगे पाटील, विश्वस्त अजित कुलकर्णी यांचे हस्ते प्रथापरंपरेप्रमाणे झाली. या वेळी श्रींच्या पूजेचे पौरोहित्य क्षेत्रोपाध्ये राहुल जोशी, यशोदीप जोशी, यज्ञेश्वर जोशी, नाना चौधरी, शंतनू पोफळे, निखिल प्रसादे, श्रीरंग तुर्की यांनी पौरोहित्य केले. संत नामदेवराय यांचे वतीने नामदास परिवारातर्फे महापूजा झाली. भाविकांच्या महापूजाही यादरम्यान झाल्या.

कीर्तनसेवेनंतर नामदेवरायांच्या दिंडीने नामदेव महाराज याचे वैभवी दिंडीतून नामदेवरायांच्या पादुका मंदिरात दिंडीने प्रदक्षिणा करत आणल्या. दरम्यान गाभाºयात भाविकांच्या महापूजा सुरु होत्या. पुढे महाद्वारात काल्याचे कीर्तन सेवा झाली. कीर्तनसेवा रुजू करून हैबतरावबाबा यांचे दिंडीचा मंदिरात हरीनाम गजरात प्रदक्षिणेस प्रवेश झाला. तत्पूर्वी मंदिरात नामदेव महाराज यांचे वंशज भावार्थ महाराज नामदास यांचे माउलींच्या संजीवन समाधी प्रसंगावर आधारित कीर्तनसेवेत हृदयस्पर्शी वाणीतून समाधी प्रसंगात माउलीचे जीवनकार्य आणि सोहळा भाविकांच्या डोळ्यांसमोर उभा राहिला आणि भाविकांच्या नेत्रांतून अश्रूही टपकले.

त्यापूर्वी श्रींच्या गाभाºयात महापूजा बंद करून स्वकामच्या स्वयंसेवकांनी श्रींचा गाभारा स्वच्छ केला. गाभारा स्वच्छतेनंतर माउलीचे मंदिरीतील क्षेत्रोपाध्यांनी श्रींचे संजीवन समाधीवर वेदमंत्रोच्चारात श्रींचे संजीवन समाधीची पूजा पुष्पहार अर्पण करीत केली. श्रींच्या समाधीची पूजा परंपरेप्रमाणे बांधली. जसजशी श्रींचे समाधी प्रसंगाची वेळ समीप येत होती, तशी मंदिर व प्राकारासह महाद्वारात भाविकांची एकाच गर्दी उतरोत्तर वाढली. मिळेल त्या जागेत थांबून भाविकांनी श्रींचे संजीवन समाधी दिन सोहळा प्रसंगी कीर्तनसेवेस मंदिरासह नदीघाटावर देखील हजेरी लावली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button